'ड्रायव्हिंग लायसन्सला मिळणार 'ग्रेड्स'; नियम मोडाल तर परवाना होईल थेट रद्द', मंत्री गडकरी यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 09:13 IST2026-02-27T09:10:50+5:302026-02-27T09:13:39+5:30
नव्या प्रणालीत नियम मोडणाऱ्यांच्या लायसन्सवरील 'पॉइंट्स' कापले जातील व वारंवार चुका केल्यास लायसन्स रद्द केले जाईल.

'ड्रायव्हिंग लायसन्सला मिळणार 'ग्रेड्स'; नियम मोडाल तर परवाना होईल थेट रद्द', मंत्री गडकरी यांची घोषणा
नवी दिल्ली : बेशिस्त ड्रायव्हिंग आणि वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी 'ग्रेड' आधारित ड्रायव्हिंग लायसन्स प्रणाली लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या प्रणालीत नियम मोडणाऱ्यांच्या लायसन्सवरील 'पॉइंट्स' कापले जातील व वारंवार चुका केल्यास लायसन्स रद्द केले जाईल.
गडकरी यांनी सांगितले की, प्रत्येक वाहनचालकाच्या परवान्याला ठरावीक 'पॉइंट्स' दिले जातील. सिग्नल तोडणे, ओव्हरस्पीडिंग किंवा वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे अशा चुका केल्यास हे पॉइंट्स कापले जातील. जर सर्व पॉइंट्स संपले, तर संबंधित चालकाचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. गंभीर गुन्हा असेल तर परवाना कायमचा रद्द केला जाईल.
अपघातग्रस्तांवर मोफत 'कॅशलेस' उपचार
गडकरी यांनी सांगितले की, अपघातग्रस्तांना मदत करण्यास तसेच उपचार खर्चास घाबरू नका. 'पीएम राहत योजनें'तर्गत जखमींना १.५ लाखांपर्यंतचे कॅशलेस उपचार मोफत दिले जातात. अपघातानंतरच्या पहिल्या सात दिवसांचा खर्च सरकार उचलते.

अपघातांची आकडेवारी
गडकरींनी सांगितले की, देशात दरवर्षी ५ लाख अपघात होतात. १.८ लाख लोक जीव गमावतात. मृतांमध्ये १८ ते ४५ वयोगटातील तरुणांचे प्रमाण ७२% आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मृतांचा आकडा १०,११९ आहे. विना हेल्मेट ५४ हजार, तर विना सीटबेल्ट १४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.