उदयोन्मुख शक्ती म्हणून देशाला ओळख देणारा नेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 08:23 IST2024-12-28T08:20:40+5:302024-12-28T08:23:43+5:30
अविश्रांत परिश्रम करून यशाचे शिखर कसे गाठता येते, याचा धडा भावी पिढ्यांना मनमोहन सिंग यांच्या जीवनातून मिळू शकेल. एक सालस, विद्वान व्यक्ती, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, सुधारणावादी नेते या वैशिष्ट्यांमुळे मनमोहन सिंग सर्वांच्या नित्यस्मरणात राहातील. ते अतिशय प्रामाणिक व साधे राहणीमान असलेले गृहस्थ होते. त्यांचे आयुष्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

उदयोन्मुख शक्ती म्हणून देशाला ओळख देणारा नेता
त्यांचे जीवन सर्वांना प्रेरणा देत राहील : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशाची मोठी हानी झाली आहे. देशाच्या विकासाप्रती त्यांची असलेली तळमळ व त्यांनी केेलेले कार्य महत्त्वाचे आहे. त्यांचे जीवन हे भावी पिढ्यांसह सर्वांना प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, देशाच्या फाळणीनंतर मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाने मागच्या साऱ्या गोष्टी बाजूला ठेवून आयुष्य घडविण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी केलेला संघर्ष, स्वत:चे घडविलेले आयुष्य या साऱ्या गोष्टी प्रेरणादायी आहेत.
मोदी यांनी सांगितले की, देशापुढे आर्थिक संकटे उभी असतानाच्या आव्हानात्मक काळात मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. त्यांनी त्या वेळीही देशात आर्थिक शिस्त आणण्यासाठी पावले उचलली. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून कार्यरत असताना मनमोहन सिंग यांनी देशात महत्त्वाच्या आर्थिक सुधारणा केल्या. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाच्या विकासात दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मनमोहन सिंग हे उत्तम संसदपटू होते. गेल्या काही वर्षांत आजारामुळे थकले असतानाही काही प्रसंगी व्हीलचेअरवर संसदेत येऊन त्यांनी खासदार म्हणून कर्तव्य बजावले. २००४ ते २०१४ या कालावधीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी गुजरातचा मुख्यमंत्री या नात्याने मी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांनंतर मी पंतप्रधान झालो तेव्हाही मी त्यांच्याशी संवाद साधला होता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
श्रद्धांजली अर्पण : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते सार्वजनिक जीवनावर ठसा उमटविणारे नेते असल्याचे मंत्रिमंडळाने संमत केलेल्या शोकप्रस्तावात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मिनिटे मौन पाळून सर्व मंत्र्यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या निवासस्थानी जाऊन अनेक नेत्यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
माजी पंतप्रधानांवर कुठे होतात अंत्यसंस्कार?
माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील विशेष स्मृतिस्थळांवर होतात. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या माजी पंतप्रधानांवर दिल्लीतील राजघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याचबरोबर अनेक माजी पंतप्रधानांसाठी स्वतंत्र समाधी स्थळेही बांधली आहेत.
तथापि, अंत्यसंस्कार करण्याची पद्धत दिवंगत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या धार्मिक मान्यतेनुसार असते. माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री आणि देशातील इतर मान्यवर उपस्थित असतात.
अंत्यसंस्काराचा प्रोटोकॉल कसा असतो?
भारतात माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी विशेष प्रोटोकॉल पाळला जातो. देशासाठी त्यांचे योगदान आणि पदाचा सन्मान हे त्यामागचे उद्देश असतात. अंत्यसंस्कारापूर्वी पार्थिव तिरंग्यात गुंडाळले जाते. अंत्यसंस्कार करताना २१ तोफांची सलामी देण्यात येते. लष्करी बँड आणि सशस्त्र दलाचे जवान अंत्यसंस्कारात सहभागी होतात.