नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी झाली आहे, ते माझे मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक होते असे काँग्रेस संसदीय पक्षाच्या (सीपीपी) प्रमुख सोनिया गांधी यांनी शुक्रवारी सांगितले. त्या म्हणाल्या की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. शालीनता, नम्रतेचे प्रतीक असलेला नेता आपण सर्वांनी गमावला आहे.
सोनिया गांधी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या मृत्यूमुळे सार्वजनिक जीवनात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. भारताच्या विकासात योगदान देणारा त्यांच्यासारखा नेता आम्हाला मिळाला याबद्दल काँग्रेस पक्ष कायमच कृतज्ञ राहतील. त्यांनी जी-जी पदे भूषविली तिथे उत्तम काम केले व भारताचा नावलौकिक वाढविला. ते मृदू स्वभावाचे व कणखरही होते. जगभरातील विद्वानांनी त्यांचा सन्मान केला. सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांवर त्यांची अपार निष्ठा होती.
स्मारक उभारता येईल अशा जागी अंत्यसंस्कार करा : खरगे
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारता येईल, अशा जागेवर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी विनंती काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी पत्र लिहून केली.
डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारण्याविषयी खरगे यांनी शुक्रवारी सकाळी पंतप्रधान मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिले आहे.
डॉ.मनमोहन सिंग हे भारताच्या राजकीय व आर्थिक क्षेत्रातील अतिशय आदरणीय व्यक्तिमत्त्व होते असे काँग्रेस कार्यकारिणीने शुक्रवारी म्हटले आहे. या बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, लोकभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल, खासदार प्रियांका गांधी आदी उपस्थित होते.