काँग्रेसला डबल झटका, मिलिंद देवरा यांच्यानंतर आणखी एका नेत्याचा पक्षाला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 13:33 IST2024-01-14T13:31:45+5:302024-01-14T13:33:17+5:30
राहुल गांधींच्या न्याय यात्रेपूर्वीच काँग्रेसच्या दोन नेत्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

काँग्रेसला डबल झटका, मिलिंद देवरा यांच्यानंतर आणखी एका नेत्याचा पक्षाला रामराम
Apurba Bhattacharya News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू करण्यापूर्वीच रविवारी(दि.14) दोन झटके बसले. आधी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milin Deora) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता असाममधील नेते अपूर्वा भट्टाचार्य (Apurba Bhattacharya) यांनीही काँग्रेसला राम-राम ठोकला. राहुल गांधींच्या यात्रेपूर्वी दोन नेत्यांचा राजीनामा पक्षासाठी मोठे नुकसान मानले जात आहे.
राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्र आणि आसाममधून
दरम्यान, आसाममध्ये काँग्रेस पक्षाला सातत्याने धक्के बसत आहेत. अनेक बडे नेते पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये असाम काँग्रेसच्या दोन प्रमुख नेत्यांनी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला होता. राजीनामा दिलेल्या दोन नेत्यांमध्ये नाजावचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बोरा आणि असाम प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष पोरीटुष रॉय यांचा समावेश आहे. त्यानंतर आज काँग्रेसचे सचिव अपूर्व भट्टाचार्य यांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधींची यात्राही महाराष्ट्र आणि आसाममधून जाणार आहे.
काँग्रेसला एकाच दिवसात दोन धक्के
काँग्रेसला एका दिवसात दोन धक्के बसले आहेत. पहिला धक्का मुंबईतून बसला. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर लिहिले, "आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे काँग्रेससोबतचे 55 वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. गेल्या अनेक वर्षात पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा ऋणी आहे." मिलिंद यांचे वडील मुरली देवरादेखील काँग्रेसचे दिग्गज नेते होते.