दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:17 IST2025-11-12T14:16:02+5:302025-11-12T14:17:31+5:30
Delhi Blast news: दिल्ली स्फोटात दोन स्फोटके वापरल्याचा FSL चा निष्कर्ष! ॲमोनियम नायट्रेटसह 'अधिक शक्तिशाली' स्फोटकाचे अवशेष आढळले. लाल किल्ल्याजवळून ४० हून अधिक पुरावे जप्त, फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल आणि डॉ. मुजम्मिल कनेक्शनची चौकशी सुरू.

दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानी दिल्लीतीलस्फोटाच्या तपासात फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेच्या पथकाला अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक पुरावे हाती लागले आहेत. लाल किल्ल्याजवळील घटनास्थळावरून FSL टीमने आतापर्यंत ४० हून अधिक नमुने आणि पुरावे जमा केले आहेत, ज्यात जिवंत काडतुसे आणि हातबॉम्ब सारख्या अवशेषांचा समावेश आहे.
एफएसएलच्या प्राथमिक तपासणीनुसार, स्फोटात एकापेक्षा अधिक प्रकारचे स्फोटक वापरले गेल्याचा संशय आहे, ज्यामुळे बॉम्बची तीव्रता वाढली असण्याची शक्यता आहे.
ॲमोनियम नायट्रेट : जप्त केलेल्या स्फोटक नमुन्यांपैकी एक ॲमोनियम नायट्रेट असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी फरिदाबाद येथे ३६० किलो ॲमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते आणि अल फलाह विद्यापीठाशी संबंधित डॉ. मुजम्मिल गानी आणि डॉ. शाहीन सईद यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या स्फोटाचे धागेदोरे थेट फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडले जात आहेत.
अधिक शक्तिशाली स्फोटक: दुसरा स्फोटक नमुना हा ॲमोनियम नायट्रेटपेक्षा अधिक शक्तिशाली असल्याचे मानले जात आहे. या स्फोटकाची नेमकी रासायनिक रचना आणि त्याची विध्वंसक क्षमता तपासण्यासाठी एफएसएलची विशेष टीम चोवीस तास काम करत आहे.
जप्त केलेल्या पुराव्यांमध्ये वाहनांचे अवशेष, मानवी शरीराचे भाग आणि स्फोटात वापरलेल्या इतर वस्तूंचा समावेश आहे, ज्यांचे सखोल रासायनिक विश्लेषण केले जात आहे. एनआयए आणि एफएसएलच्या विशेष पथकांना त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून या स्फोटामागील संपूर्ण कट आणि दहशतवाद्यांचे जाळे उघड होऊ शकेल.
पूर्ण विकसित नव्हता बॉम्ब, नाहीतर...
पथकांनी केलेल्या प्राथमिक निरीक्षणानुसार आयईडी चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आला होता. तसेच बॉम्ब हा प्री मॅच्युअर स्टेटमध्ये होता. तो पूर्णपणे विकसित झालेला नव्हता. त्यामुळे त्याचा परिणाम मर्यादित होता. स्फोटामुळे खड्डा निर्माण झाला नाही तसेच छर्रे देखील उडाले नाहीत.