इंदौरमध्ये दूषित पाण्याने मृत्यूतांडव; प्रश्न विचारल्यावर मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी पत्रकाराला केली शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:10 IST2026-01-01T14:02:37+5:302026-01-01T14:10:33+5:30
दूषित पाण्यावरून विचारलेल्या प्रश्नावर मंत्री कैलाश विजयवर्गीय भडकल्याचे पाहायला मिळाले.

इंदौरमध्ये दूषित पाण्याने मृत्यूतांडव; प्रश्न विचारल्यावर मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी पत्रकाराला केली शिवीगाळ
Kailash Vijayvargiya: देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदौरमध्ये दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. या गंभीर मुद्द्यावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी जाहीरपणे अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठली, ज्यामुळे अखेर विजयवर्गीय यांना माफी मागावी लागली आहे.
बुधवारी रात्री कैलाश विजयवर्गीय त्यांच्या इंदौर-१ विधानसभा मतदारसंघातील भागीरथपुरा भागात परिस्थितीचा आढावा घेत होते. यावेळी एका पत्रकाराने त्यांना दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंबाबत आणि रुग्णालयांच्या बिलांचा परतावा न मिळाल्याबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नावर विजयवर्गीय यांचा संयम सुटला. त्यांनी कॅमेऱ्यासमोरच पत्रकाराला "नॉनसेन्स प्रश्न विचारू नकोस, तू काय ****** होऊन आला आहेस का?" अशा शब्दांत अपमानित केले.
मृतांच्या आकड्यावरून गोंधळ
भागीरथपुरा भागात ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळल्यामुळे कॉलरा आणि डायरियाचा प्रादुर्भाव झाला आहे. अधिकृत आकडा ७ असला तरी, स्थानिक अहवालानुसार १० ते १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या २१२ हून अधिक लोक रुग्णालयात उपचार घेत असून ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली असून मोफत उपचारांचे आदेश दिले आहेत.
वाढत्या दबावानंतर माफीनामा
विजयवर्गीय यांच्या अभद्र भाषेमुळे पत्रकार संघटना आणि विरोधक आक्रमक झाले. चहुबाजूंनी टीका झाल्यावर त्यांनी एक्सवर पोस्ट लिहीत माफी मागितली. "गेल्या दोन दिवसांपासून आम्ही न झोपता परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या माणसांना गमावल्याच्या दुखात माझ्याकडून चुकीचे शब्द निघून गेले, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो," असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचा जोरदार प्रहार
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी यांनी या घटनेवरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. "भाजप नेत्यांचा अहंकार सातव्या अस्मानावर आहे. जनतेचा मृत्यू होत असताना मंत्री जबाबदारी झटकून शिवीगाळ करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अशा अभद्र मंत्र्याचा तातडीने राजीनामा घ्यावा," अशी मागणी पटवारी यांनी केली आहे.