गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 15:21 IST2025-08-27T15:18:24+5:302025-08-27T15:21:45+5:30

Rahul Gandhi on Election Commission : "महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि लोकसभेत मत चोरी झाली; आम्ही पुरावे सादर करू."

Donations of Rs 4300 crore to anonymous parties in Gujarat; Rahul Gandhi attacks Election Commission | गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

Rahul Gandhi on Election Commission : राजकीय पक्षांनी घेतलेल्या देणग्यांवरुन देशात अनेकवेळा राजकीय गदारोळ उडाला आहे. कधी देणग्या घेणारे राजकीय पक्ष अडचणीत आले, तर कधी देणगीदारांवर प्रश्न उपस्थित केले गेले. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांनी तर हा मुद्दा लावून धरला होता. आता दैनिक भास्करच्या एका वृत्ताचा हवाला देत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.

दैनिक भास्करच्या दाव्यानुार, गुजरातमधील १० निनावी पक्षांना ५ वर्षांत ४३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. राहुल गांधी यांनी यावरुन भाजपला धारेवर धरले आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत लिहिले की, "गुजरातमध्ये काही निनावी पक्ष आहेत, ज्यांची कोणी नावेही ऐकली नाहीत. पण, या पक्षांना ४३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. या पक्षांनी फार कमी वेळा निवडणुका लढवल्या किंवा त्यावर खर्च केला आहे."

"हे हजारो कोटी कुठून आले? या पक्षांना कोण चालवत आहे? आणि पैसे गेले कुठे? निवडणूक आयोग याची चौकशी करेल, की येथेही प्रतिज्ञापत्र मागेल? की स्वतः कायदा बदलून डेटा लपवतील?" असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. 

निवडणूक आयोगावर मत चोरीचे आरोप 

गेल्या २ महिन्यांपासून राहुल गांधी निवडणूक आयोगावर सातत्याने टीका करत आहेत. यासोबतच निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत असल्याची टीकाही त्यांनी करत आहेत. आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या त्यांनी मतदार हक्क यात्रा काढली आहे. याद्वारे ते राज्यभर दौरा करत आहेत. आज ही यात्रा मुझफ्फरनगरमध्ये पोहोचली. यावेळी रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, "प्रत्येक वेळी असे होते की, प्रथम ओपिनियन पोल येतात तेव्हा काँग्रेस जिंकत असल्याचे दिसून येते, परंतु निकालात भाजप जिंकते. २०१४ च्या आधी गुजरातमधून मत चोरीची प्रक्रिया सुरू झाली. गुजरात मॉडेल हे हिट मॉडेल नाही, तर गुजरात मॉडेल हे मत चोरीचे मॉडेल आहे."

गरीबांची मते कापली जात आहेत

"महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि लोकसभेतही मत चोरी झाली. आम्ही कर्नाटकात आमच्या टीम तैनात केल्या आणि भाजपची मत चोरी समोर आणली. आम्ही भविष्यातही त्यांच्या चोरीचे पुरावे सादर करू. संविधानात लिहिले आहे की, एका व्यक्तीला एका मताचा अधिकार आहे, परंतु भाजप यावर हल्ला करत आहे. बिहारमध्ये ज्यांची मते कापली गेली, ते मागास, दलित आणि अल्पसंख्याक होते. भारतातील गरिबांची मते कापली जात आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह मते चोरतात आणि नंतर निवडणुका जिंकतात. निवडणूक आयोग या लोकांना मदत करत आहे," असा आरोपही राहुल गांधींनी यावेळी केला. 

Web Title: Donations of Rs 4300 crore to anonymous parties in Gujarat; Rahul Gandhi attacks Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.