ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:47 IST2025-08-21T18:47:30+5:302025-08-21T18:47:47+5:30
Donald Trump Election Funding: अमेरिकन दुतावासाने याबाबतचा खुलासा केंद्र सरकारकडे केला आहे, तो सरकारने संसदेत मांडला आहे. USAID ने भारतातील निवडणूक उपक्रमांसाठी कोणताही निधी दिला नाही, असे यात म्हटले आहे.

ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
एलन मस्क जेव्हा डॉजमध्ये होते तेव्हा त्यांच्या टीमने दिलेल्या माहितीवरून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या दुसऱ्या देशांना दिल्या जाणाऱ्या पैशांना कात्री लावत होते. USAID ने भारतातील निवडणूक उपक्रमांसाठी, मतदान प्रभावित करण्यासाठी निधी दिल्याचा आरोप तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला होता. यावरून भाजपने काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली होती. आता भारतातील अमेरिकी दूतावासाने असा कोणताही निधी दिला गेला नाही, असे स्पष्ट केले आहे.
अमेरिकन दुतावासाने याबाबतचा खुलासा केंद्र सरकारकडे केला आहे, तो सरकारने संसदेत मांडला आहे. USAID ने भारतातील निवडणूक उपक्रमांसाठी कोणताही निधी दिला नाही. भारतातील निवडणूक-संबंधित अनुदानांच्या यादीत $21 दशलक्षची नोंदही नाहीय, असे दूतावासाने म्हटले आहे.
USAID ने भारतातील निवडणुकीत मतदारांची संख्या वाढवण्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. तसेच भारताला देण्यात येत असलेली उर्वरित रक्कम रोखत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मागील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सरकारवर भारतातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप वारंवार केला होता. 'माझे मित्र पंतप्रधान मोदींना भारतातील मतदारांचे मतदान वाढविण्यासाठी २१ दशलक्ष डॉलर्स दिले जात आहेत. आम्ही भारतातील मतदानासाठी २१ दशलक्ष डॉलर्स देत आहोत. आमचे काय? मलाही मतदान वाढवायचे आहे', असे ट्रम्प म्हणाले होते.
या दाव्यावरून भारताने खरोखरच असा निधी दिला गेला होता का, याबाबत अमेरिकन दुतावासाकडे माहिती मागितली होती. अमेरिकन दूतावासाने २ जुलै रोजी या संदर्भात माहिती दिली. यात यूएसएआयडी द्वारे निधी पुरवलेल्या सर्व अनुदानांची यादी देण्यात आली आहे. मध्ये निवडणुकीशी संबंधित कोणत्याही अनुदानाचा उल्लेख नाही. तसेच यूएसएआयडी १५ ऑगस्टपासून भारतात काम करणे थांबवणार असल्याचेही अमेरिकी राजदुतांनी सांगितले असल्याचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.