ट्रम्प सरकारची कारवाई; अमेरिकेतील अवैध भारतीय स्थलांतरितांना मायदेशात पाठवले..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:25 IST2025-02-05T14:50:14+5:302025-02-05T15:25:16+5:30
अमेरिकेचे सैन्य विमान 104 जणांच्या पहिल्या तुकडीसह अमृतसरमध्ये दाखल.

ट्रम्प सरकारची कारवाई; अमेरिकेतील अवैध भारतीय स्थलांतरितांना मायदेशात पाठवले..!
America-India : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवैध स्थलांतरितांवर कारवाई सुरू केली आहे. यात अमेरिकेत राहणाऱ्या अवैध भारतीयांवरही कारवाई केली जात आहे. याचाच भाग म्हणून, अमेरिकेचे लष्करी विमान अवैध भारतीय स्थलांतरितांना घेऊन आज भारतात पोहोचले. 104 अवैध भारतीय स्थलांतरितांची पहिली तुकडी अमेरिकेच्या C-147 विमानातून भारतात पोहोचली.
हे विमान अमृतसर विमानतळावर उतरले. यावेळी पोलीस आणि प्रशासन तैनात होते. अमेरिकन दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, विमानात एकूण 104 भारतीय आहेत, ज्यात 13 मुले, 79 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे. या भारतीयांपैकी गुजरात-33, पंजाब-30, यूपी-03, हरियाणा-33, चंडीगड-02, महाराष्ट्र-03 आहेत.
#WATCH | US Air Force plane carrying Indian citizens who allegedly illegally migrated to USA lands in Punjab's Amritsar. pic.twitter.com/JmT1xApZKO
— ANI (@ANI) February 5, 2025
डंकी मार्गाने अमेरिकेत प्रवेश
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीयांना मेक्सिको-अमेरिका सीमेवर पकडण्यात आले होते. ते सर्वजण कायदेशीररित्या भारतातून निघाले होते, मात्र पुढे डंकी मार्गाने अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. या लोकांना भारतात आल्यावर अटक करण्यात येणार नाही, कारण त्यांनी कोणत्याही प्रकारे भारतीय कायद्यांचे उल्लंघन केलेले नाही.
भारताची अमेरिकेला साथ
दरम्यान, 27 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेतून अवैध स्थलांतरितांना भारतात परत आणण्यासाठी भारत योग्य पावले उचलेल, असे सांगितले होते. अंदाजानुसार, अमेरिकेत अंदाजे 18,000 अवैध स्थलांतरित आहेत, ज्यांना भारतात पाठवले जाणार आहे. ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर भारत सरकारने ही समस्या सोडवण्यासाठी अमेरिकेसोबत काम करण्याची तयारी दर्शवली होती.
प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत सुमारे 7.25 लाख अवैध भारतीय स्थलांतरित राहतात. बेकायदेशीर स्थलांतरितांची ही संख्या तिसरी सर्वात मोठी आहे. मेक्सिको पहिल्या तर एल साल्वाडोर दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात भारत सरकारने म्हटले होते की, अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना परत घेण्यास भारत नेहमीच तयार आहे.