मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याने घेतला पंगा, गुंडांना दाखवला इंगा, घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 21:13 IST2022-01-04T21:12:24+5:302022-01-04T21:13:04+5:30
Crime News: कुत्रा हा प्राणी आपली स्वामिभक्ती आणि ईमानदारीसाठी ओळखला जातो. ग्वाल्हेरमध्ये एका कुत्र्याने दाखवलेल्या शौर्याची सध्या चर्चा सुरू आहे. या कुत्र्याने त्याच्या मालकाला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली.

मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याने घेतला पंगा, गुंडांना दाखवला इंगा, घटना सीसीटीव्हीत कैद
ग्वाल्हेर - कुत्रा हा प्राणी आपली स्वामिभक्ती आणि ईमानदारीसाठी ओळखला जातो. ग्वाल्हेरमध्ये एका कुत्र्याने दाखवलेल्या शौर्याची सध्या चर्चा सुरू आहे. या कुत्र्याने त्याच्या मालकाला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली. काही गुंड या कुत्र्याच्या मालकाचे अपहरण करण्यासाठी आले होते. मात्र हा बहादूर कुत्रा या गुंडांवर त्वेशाने तुटून पडला. त्याचा हा आवेश पाहून गुंड भेदरले आणि जीव वाचवून पळत सुटले. कुत्र्याच्या शौर्यामुळे मालक गुंडांच्या तावडीत जाण्यापासून वाचला.
वाईट काळात कुणीही मदतीला येत नाही. मात्र आजच्या काळातही कुत्रा हा प्राणी मालकाप्रति आपली निष्ठा अगदी प्रमाणिकपणे निभावताना दिसतो. ग्वाल्हेरमधील या घटनेतून हे सिद्ध झाले आहे. या कुत्र्याने मालकाला अपहरण होण्यापासून वाचवले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आले आहेत. त्यामध्ये मालकाला अपहरण करण्यासाठी आलेल्या गुंडांवर कुत्रा तुटून पडताना दिसत आहे.
ग्वाल्हेरमधील थाटीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक कॉलोनीमध्ये राहणारे नितीन शाक्य आपल्या घरी होते. त्याचवेळी व्हॅनमधून चार-पाच बदमाश त्यांच्या घरी आले. त्यांनी नितीन यांना बाहेर बोलावले आणि मारहाण सुरू केली. ते नितीन याला मागे ढकलून व्हॅनमध्ये कोंबून नेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी नितीन यांना पकडून मारहाण केली. त्यावेळी आजूबाजूला शेकडो लोक जमा झाले. मात्र कुणीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच पोलिसांनाही माहिती दिली नाही. मात्र नितीन यांच्या घरातील कुत्र्याने या गुंडांच्या अंगावर झेप घेतली. कुत्र्याने केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे गुंड घाबरले. त्यांनी नितीनला तिथेच सोडून जीव वाचवण्यासाठी पळ काढला.
दरम्यान, या घटनेनंतर नितीन यांनी थाटीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्दा दाखल केला आहे. दरम्यान, ज्यांनी नितीन यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या कुटुंबातील २१ वर्षांची तरुणी बेपत्ता आहे. सदर तरुणी नितीन यांच्या एका नातेवाईकाने पळवून नेत्यांची शंका आहे. ते या तरुणीची माहिती विचारण्यासाठी नितीनकडे आले होते. नितीन यांनी कुठलेच उत्तर दिले नाही. तेव्हा त्यांनी त्यांना अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्याने त्यांना वाचवले.