धक्कादायक! कुत्र्याला दगड मारला म्हणून मालकाने झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 10:14 IST2019-01-08T09:50:38+5:302019-01-08T10:14:19+5:30
कुत्र्याला दगड मारला म्हणून कुत्र्याच्या मालकाने गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या वेलकम परिसरातील जनता कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

धक्कादायक! कुत्र्याला दगड मारला म्हणून मालकाने झाडली गोळी
नवी दिल्ली - पाळीव कुत्र्याला दगड मारणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. कुत्र्याला दगड मारला म्हणून कुत्र्याच्या मालकाने गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या वेलकम परिसरातील जनता कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत अफाक अली या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहताब असे आरोपीचे नाव आहे. अफाक मेहताबच्या घराजवळून जात होता. त्याच दरम्यान मेहताबच्या पाळीव कुत्र्याने अफाकवर भुंकायला सुरुवात केली. तसेच कुत्र्याने त्याचा चावा घेण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी अफाकने रस्त्यावरचा एक दगड उचलून कुत्र्यावर भिरकावला. मेहताबने अफाकला दगड मारताना पाहिल्यावर त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात कुत्र्याच्या मालकाने त्याच्याजवळची बंदूक काढली आणि अफाकवर गोळया झाडल्या. गोळीबाराच्या घटनेनंतर मेहताब फरार झाला आहे.
अफाकच्या सासऱ्यांनी पोलिसांना फोन करून त्यांच्या जावयावर कोणीतरी गोळीबार केला असल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी अफाकला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी कुत्र्याच्या मालकाविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.