कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 08:45 IST2025-10-07T08:45:06+5:302025-10-07T08:45:45+5:30
भेसळयुक्त कफ सिरपमुळे देशभरात अनेक निष्पाप बालकांचा बळी गेल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
भेसळयुक्त कफ सिरपमुळे देशभरात अनेक निष्पाप बालकांचा बळी गेल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. यातही मध्य प्रदेशातील स्थिती सर्वात बिकट असून, येथील मृत्यूंच्या मालिकेनंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. याच कारवाईचा भाग म्हणून छिंदवाडा येथील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रवीण सोनी यांना कथित निष्काळजीपणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मात्र, मध्य प्रदेश पोलिसांच्या या कारवाईवर इंडियन मेडिकल असोसिएशनने तीव्र संताप व्यक्त केला असून, ही कायदेशीर अज्ञानाची पराकाष्ठा असल्याची टीका केली आहे.
औषध नियामक प्रणालीचे अपयश डॉक्टरांवर का?
IMAने सोमवारी एक अधिकृत निवेदन जारी करून डॉक्टरांच्या अटकेचा निषेध केला आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, कफ सिरपला मंजुरी देणे आणि त्याची गुणवत्ता तपासणे हे पूर्णपणे औषध नियामक प्रणालीच्या अखत्यारीत येते. सिरपमधील विषारी रसायन डायथिलीन ग्लायकोल या घातक घटकाची सांद्रता तपासण्यात केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना आणि मध्य प्रदेश अन्न व औषध प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.
"या बालकांच्या मृत्यूची संपूर्ण जबाबदारी औषध उत्पादक कंपन्या आणि नियामक अधिकाऱ्यांवर आहे. आपली कर्तव्ये पूर्ण न करू शकलेल्या अधिकाऱ्यांनी आणि कंपन्यांनी केलेल्या चुकांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी प्रामाणिक डॉक्टरांना लक्ष्य केलं जात आहे," असा थेट आरोप आयएमएने केला आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी केलेली अटकेची कारवाई 'अंधाधुंद' असून, यामुळे देशभरातील डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे, असं आयएमएने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे.
आयएमएने म्हटलं की, "सक्षम अधिकाऱ्यांनी मंजूर केलेली औषधे लिहून देण्याचा अधिकार आणि विशेषाधिकार डॉक्टरकडे असतो. अशा डॉक्टरांना अटक केल्यामुळे देशात अत्यंत चुकीचा संदेश गेला आहे. जोपर्यंत औषधाचे गंभीर दुष्परिणाम समोर येत नाहीत, तोपर्यंत डॉक्टरांना ते औषध दूषित आहे की नाही, हे जाणून घेणं शक्यच नसतं."
अटकेपूर्वी ३ अधिकारी निलंबित, औषध नियंत्रकाची बदली
या घटनेनंतर मध्य प्रदेश सरकारवर प्रचंड टीका झाली होती. कफ सिरपमुळे १४ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सरकारने तातडीने कठोर पाऊले उचलली आहेत. सोमवारीच राज्य सरकारने तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले, तर एका औषध नियंत्रकाची बदली केली. तसेच, अनेक राज्यांनी या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या विक्री आणि पुरवठ्यावर बंदी घातली आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशातील छिंदवाडासोबतच तामिळनाडूच्या कांचीपुरम येथील मेसर्स श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या संचालकावरही अनैच्छिक हत्या (BNS कलम १०५) आणि औषधांमध्ये भेसळ (कलम २७६) सह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोषींवर तातडीने कारवाई करा आणि भरपाई द्या!
आयएमएने आपल्या निवेदनात पीडित कुटुंबीयांना आणि बदनामी सहन करावी लागलेल्या डॉक्टर प्रवीण सोनी यांना तातडीने योग्य भरपाई देण्याची मागणी केली आहे. "या असहाय बालकांच्या मृत्यूची संपूर्ण जबाबदारी उत्पादक कंपन्या आणि संबंधित सरकारी अधिकाऱ्यांची आहे. डॉक्टरी पेशाला धमकावणे अत्यंत अनुचित आहे आणि आयएमए याचा तीव्र विरोध करेल," असा इशारा देत संघटनेने दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.