ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 14:30 IST2025-11-07T14:29:12+5:302025-11-07T14:30:37+5:30
प्रियंका गांधींचा भर सभेत मुख्य निवडणूक आयुक्तांना धमकी वजा इशारा.

ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
Priyanka Gandhi Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काल(दि.7) पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केलेल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. रीगा येथे झालेल्या सभेत भाषण करताना त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना थेट धमकी वजा इशारा दिला आहे.
निवृत्ती सुखाची होईल असे समजू नका...
प्रियंका गांधी म्हणाल्या, "ज्ञानेश कुमार, जर तुम्हाला वाटतं असेल की, निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येईल, तर तसे होणार नाही. मी जनतेला सांगते, या नावाला कधीही विसरू नका." यावेळी प्रियंकांनी ज्ञानेश कुमार यांच्यासोबत इतर निवडणूक आयुक्त एस. एस. संधू आणि विवेक जोशी यांचीही नावे घेतली. भाषणादरम्यान जेव्हा त्यांनी या तिघांची नावे घेतली, तेव्हा उपस्थितांनी “चोर-चोर” अशी घोषणाबाजी केली.
1. ज्ञानेश कुमार
— Congress (@INCIndia) November 6, 2025
2. एस. एस. संधू
3. विवेक जोशी
ये चुनाव आयोग के सबसे ऊंचे अधिकारी हैं, जो देश के संविधान और लोकतंत्र के साथ खिलवाड़ कर रहे हैं।
ये तीन लोग आपके अधिकार छीन रहे हैं। इनके नाम याद कर लीजिए। इनको पद और आयोग के पीछे छिपने मत दीजिए।
जो लोग देश के साथ विश्वासघात कर… pic.twitter.com/ZTjltzoXy9
प्रियंका गांधी यांनी सभेत हरियाणा निवडणुकीचा उल्लेख करत म्हटले की, "हरियाणामध्ये मतांची चोरी कशी झाली, ते तुम्ही पाहिले. मी तुम्हाला सांगते, ही तीन नावे लक्षात ठेवा- ज्ञानेश कुमार, एस. एस. संधू आणि विवेक जोशी. या लोकांनी लोकशाहीशी विश्वासघात केला आहे. जनता आमची आई आहे. आई उदार असते, पण जर तिच्याशी फसवणूक झाली, तर ती माफ करत नाही. हे लोक निवृत्ती घेऊन शांततेत राहतील असे वाटत असेल, तर त्यांनी तो विचार आता सोडून द्यावा," असा इशारा प्रियंका गांधी यांनी दिला.
राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्ला
यापूर्वी राहुल गांधींनीही अनेकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दावा केला की, हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सुमारे 25 लाख बनावट मतांच्या माध्यमातून ‘चोरी’ झाली आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस समर्थक मतदारांची नावे जाणूनबुजून वगळण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, निवडणूक आयोगाने राहुल यांचा आरोप फेटाळून लावला आहे.