विधानसभेत नमाज आणि हनुमान चालीसेवर वाद, वैतागून अध्यक्ष म्हणाले- मला मारा पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 19:20 IST2021-09-07T19:20:25+5:302021-09-07T19:20:31+5:30
Jharkhand Assembly: झारखंड विधानसभेत नमाज पठणासाठी खोली देण्यावरुन वाद सुरू झाला आहे.

विधानसभेत नमाज आणि हनुमान चालीसेवर वाद, वैतागून अध्यक्ष म्हणाले- मला मारा पण...
रांची: मंगळवारी झारखंड विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी खोली वाटपाच्या मुद्द्यावर जोरदार निदर्शने झाली. भगव्या रंगाचे कपडे परिधान करून, जय श्री राम आणि हनुमान चालीसाचे पठण करत भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणला.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप आमदारांनी नमाजसाठी खोल्यांचे वाटप आणि राज्याच्या रोजगार धोरणाचा विरोध सुरू केला. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो यांनी गोंधळ निर्माण करणाऱ्या सदस्यांना सभागृहाचे कामकाज चालू ठेवण्याची विनंती केली. पण, त्यांच्या आवाहनाचा फारसा परिणाम होताना दिसत नाही.
'नाराज असाल तर मला मारा...'
प्रश्नोत्तराच्या तासात आंदोलक सदस्यांनी घोषणाबाजी केल्याने कामकाज दुपारी साडेबारापर्यंत तहकूब करावे लागले. विधानसभा अध्यक्ष महतो यांनी विरोध करणाऱ्या आमदारांना 'अध्यक्षांच्या खुर्चीचा अपमान सहन केला जाणार नाही. तुम्ही नाराज असाल तर मला मारा, पण कामकाजात अडथळा आणू नका', अशा सूचना दिल्या.