बिहारमध्ये जागावाटपावरून रालोआतील पक्षांत नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 14:49 IST2025-10-14T14:48:42+5:302025-10-14T14:49:02+5:30
मांझी म्हणाले, आम्ही गरीब आहोत, म्हणून जे मिळाले त्यावर समाधानी; काँग्रेसच्या उमेदवारांची यादी तयार; जागावाटप लवकर होण्याची शक्यता

बिहारमध्ये जागावाटपावरून रालोआतील पक्षांत नाराजी
एस. पी. सिन्हा -
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी रालोआमध्ये जागावाटप निश्चित झाले असले तरी काही घटक पक्षांत यावरून असंतोष आहे. विशेषत: हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (हम) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी हलक्या सुरात ही नाराजी व्यक्त केली असून, राष्ट्रीय लोक मोर्चाचे (रालोमो) नेते खा. उपेंद्र कुशवाह यांनीही जागावाटपाच्या सूत्राबाबत समाधानी नसल्याचे स्पष्ट केले आहे. या दोन्ही पक्षांना प्रत्येकी सहा जागा देण्यात आल्या आहेत.
मी पंतप्रधान मोदींसोबतच...
या निवडणुकीत पक्षासाठी १५ जागा मागितल्या होत्या. परंतु, फक्त ६ जागा देण्यात आल्या. असे असले तरी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पूर्णपणे आहोत व निर्णयावर समाधानी आहेत, असे मांझी यांनी म्हटले आहे. ‘आम्ही गरीब आहोत, म्हणून जे मिळाले त्यावर समाधानी आहोत’, असे ते म्हणाले. सर्व जागा जिंकून आपण रालोआला बळ देऊ, असे त्यांनी नमूद केले.
रालोआने २४३ विधानसभा जागांसाठी जागावाटप जाहीर केले. यात भाजप व जदयू प्रत्येकी १०१ जागा देण्यात आल्या आहेत.
भाजप उमेदवारांची
आज घोषणा?
मतदारसंघांचे वाटप झाल्यानंतर आता उमेदवारांची घोषणा कधी होते याकडे राज्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष आहे. सध्या ही नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली असून, तेथून मंजुरी मिळताच उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. ही यादी आज,
मंगळवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
जागांच्या अदलाबदलीवर मंथन : भाजप व जदयू यांनी काही जागांवर अदलाबदली करता येईल का यावर मंथन सुरू आहे. असे बदल करून जागा छोट्या पक्षांना सोडण्याचा दोन्ही प्रमुख पक्षांचा विचार आहे. यासाठी झा यांच्या निवासस्थानी बैठक झाली.
राजकीय हालचालींना वेग
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १६ ऑक्टोबरपासून बिहार दौऱ्यावर असतील. या काळात उमेदवारी अर्ज भरण्यासोबतच प्रचाराला वेग येईल.
इंडिया आघाडीच्या दोन नेत्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. राजदच्या मोहनियाच्या आमदार संगीता कुमार व बिक्रमचे दोन वेळा आमदार राहिलेले काँग्रेस नेते सिद्धार्थ सौरव यांचा यात समावेश आहे.
काँग्रेसच्या उमेदवारांची यादी तयार, महाआघाडीचे जागावाटप दोन दिवसांत झाले नाही तर पक्ष पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता
एसबीएसपीची बंडखोरी
उत्तर प्रदेशात रालोआचा सहकारी पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीने बंडखोरी करीत १५३ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. या पक्षाला भाजपप्रणीत रालोआने एकही जागा दिलेली नाही.
अरुण सिन्हा यांची माघार
भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्यापूर्वीच नाराजीतून कुम्हरारमधून पाच वेळा आमदार राहिलेले अरुणकुमार सिन्हा यांनी निवडणूक लढवायची नाही, अशी घोषणा केली.