Dis’Qualified MP... खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये केला बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 11:55 IST2023-03-26T11:54:50+5:302023-03-26T11:55:43+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांच्या ट्विटर बायोमध्ये बदल केले आहेत.

Dis’Qualified MP... खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये केला बदल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांच्या ट्विटर बायोमध्ये बदल केले आहेत. आता राहुल गांधी यांनी आपल्या बायोमध्ये 'डिस्क्वालिफाईड एमपी'चा विशेष उल्लेख केला आहे. खरं तर, राहुल गांधींना त्यांच्या 'मोदी आडनाव' टिप्पणीबद्दल दोषी ठरवून खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलं होतं. यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या बायोमध्ये डिसक्वालिफाईड एमपी असं लिहिले आहे.
मोदी आडनाव प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शुक्रवारी सभापती ओम बिर्ला यांनी त्यांनी खासदारकी रद्द केली. सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं. दरम्यान, न्यायालयानं राहुल गांधींची तुरुंगवासाची शिक्षा एका महिन्यासाठी स्थगित केली. मात्र तरीही त्यांच्याकडे उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आहे.
राहुल गांधींनी साधला निशाणा
मला संसदेतून आजीवन अपात्र ठरविले किंवा तुरुंगवास झाला तरीही देशातील लोकशाहीचे रक्षण करत राहू, अशा शब्दात आक्रमक झालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला. घाबरलेल्या सरकारने त्यांना अपात्र ठरवून विरोधकांकडे मोठे शस्त्र दिल्याचा दावा त्यांनी केला.
अदानी मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील त्यांच्या पुढच्या भाषणाला घाबरले म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. हा संपूर्ण खेळ या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा होता. कारण, सरकारला या प्रकरणावरून भीती वाटत होती, असंही ते म्हणाले.