'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 20:54 IST2025-05-07T20:53:17+5:302025-05-07T20:54:12+5:30

Pm Modi hints Operation Sindoor: काल रात्री मोदींचे ते विधान अन् अवघ्या चार तासांनी पाकिस्तानवर झाला 'एअरस्ट्राईक'

Did Prime Minister Modi give a hint about 'Operation Sindoor' yesterday as 'that' sentence goes viral | 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा

'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा

Pm Modi hints Operation Sindoor : काश्मीरच्या पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला ( Pahalgam Terror Attack ) झाला. त्यात २६ निष्पाप हिंदूंची हत्या करण्यात आली. याचा बदला म्हणून मंगळवारी रात्री दीडच्या भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या मार्फत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. तिन्ही सैन्यदलांनी मिळून संयुक्तपण केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमधी ५ दहशतवादी तळांना एकाचवेळी टार्गेट करण्यात आले. या हल्ल्याची अधिकृत माहिती भारत सरकारच्या सैन्यदलाने बुधवारी दुपारी दिली. पण पंतप्रधान मोदी यांनी भारताला या एअरस्ट्राईकबद्दल आधीच संकेत दिले होते का, अशी चर्चा एका वाक्यावरून रंगली आहे.

मोदींनी खरंच दिली होती 'हिंट'?

पंतप्रधान मोदी हे पहलगामच्या हल्ल्यानंतर विविध ठिकाणी जाहीर भाषणात वेगवेगळ्या विषयांवर बोलले. त्यांनी पाकिस्तानला वेळोवेळी सज्जड दम भरला. दहशतवाद्यांची आता खैर नाही असे मोदींनी वेळोवेळी ठणकावून सांगितले. इतकेच नव्हे तर गेल्या काही दिवसात मोदींनी सैन्यदलाचे उच्चपदस्थ अधिकारी, कॅबिनेटमधील आणि विरोधी पक्षातील महत्त्वाची नेतेमंडळी, यांसह अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यासोबतच मंगळवारी एका जाहीर कार्यक्रमात मोदी यांनी उपस्थितांशी आणि भारतीयांशी संवाद साधला होता. या भाषणात ते पहिल्यांदा सिंधू जल करारावर बोलले होते. त्याच कार्यक्रमात मोदी असेही म्हणाले होते - "मुझे भी देर रात होने वाली है." मॉकड्रिल किंवा इतर महत्त्वाच्या विषयांवर एखादी बैठक असावी असे लोकांना त्यावेळी वाटले. पण आज पहाटे जेव्हा या एअरस्ट्राईकची बातमी आली, तेव्हा या वाक्यामागच्या हिंटचा उलगडा झाला अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

भारत-पाकिस्तानात बैठकांचे सत्र

दरम्यान, पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय लष्कराने काल मध्यरात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली. या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले, ज्यात सुमारे १०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमावर्ती नऊ राज्यांचे मुख्यमंत्री, डीजीपी आणि मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली. बैठकीदरम्यान, शाह यांनी युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेतला. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सकाळपासूनच बैठका घेण्याचा सपाटा लावला. पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची (NSC) बैठक झाली. यामध्ये कॅबिनेट मंत्री, सर्व प्रांतांचे मुख्यमंत्री, सर्व लष्कर प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Did Prime Minister Modi give a hint about 'Operation Sindoor' yesterday as 'that' sentence goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.