धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर; कलाकारांची रुग्णालयात रीघ, चुकीच्या बातम्यांमुळे कुटुंबीयांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 08:07 IST2025-11-12T08:07:33+5:302025-11-12T08:07:42+5:30
Dharmendra Health Update: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर १० नोव्हेंबरपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी इलेक्ट्राॅनिक मीडिया, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियावर त्यांच्या चुकीच्या बातम्या पसरल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर; कलाकारांची रुग्णालयात रीघ, चुकीच्या बातम्यांमुळे कुटुंबीयांना मनस्ताप
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर १० नोव्हेंबरपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी इलेक्ट्राॅनिक मीडिया, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियावर त्यांच्या चुकीच्या बातम्या पसरल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ लेखक-गीतकार जावेद अख्तर यांच्यासह अनेकांचा गैरसमज झाला आणि त्यांनी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. सत्य परिस्थिती समजताच त्यांनी पोस्ट डिलीट केली, पण त्यामुळे धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला.
धर्मेंद्र यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत रुग्णालयात आहेत. या दरम्यान सलमान खान, शाहरूख खान, आर्यन खानसोबत, गोविंदा, रितेश देशमुख, अमिषा पटेल आदी अनेक कलाकारांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. या दरम्यान धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी त्यांच्या निधनाच्या अफवा फेटाळून लावत अशा बातम्या पसरवणाऱ्यांना कधीच माफ केले जाऊ शकत नाही, असे म्हटले. धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून ते उत्तम प्रकारे बरे होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते लवकरच बरे होतील : ईशा
चुकीच्या बातम्यांमुळे नाराज झालेल्या हेमा मालिनी यांनी लिहिले की, हे जे घडत आहे ते माफ करण्यासारखे नाही. उपचार सुरू असलेल्या आणि सुधारणा होत असलेल्या व्यक्तीबद्दल जबाबदार माध्यमे अशा खोट्या बातम्या कशा काय पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि गैरजबाबदार आहे.संयम बाळगण्याचे आवाहन करत ईशा देओलने लिहिले की, माध्यमे अफवांना वाव देत असून, खोट्या बातम्या पसरवत आहेत. माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत.
निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ
खोट्या बातम्यांनंतर ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर आणि धर्मेंद्र यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली. रुग्णालय परिसरातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी अतिरिक्त पोलिस दल तैनात केले आहे. यासोबतच रुग्णालयाच्या आवारातील घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.