Dharashiv: ड्रग्ज पेडलर गोळेच्या पतीविरुद्ध गुन्हा, आरोपींची संख्या पोहोचली बारावर
By बाबुराव चव्हाण | Updated: March 1, 2025 22:41 IST2025-03-01T22:40:57+5:302025-03-01T22:41:10+5:30
Dharashiv Crime News: तुळजापूर येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढत चालली आहे. शनिवारी मुंबई येथील ड्रग्ज पेडलर महिला संगीत गोळेच्या पतीविरुद्ध तामलवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Dharashiv: ड्रग्ज पेडलर गोळेच्या पतीविरुद्ध गुन्हा, आरोपींची संख्या पोहोचली बारावर
- बाबुराव चव्हाण
धाराशिव/तामलवाडी - तुळजापूर येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढत चालली आहे. शनिवारी मुंबई येथील ड्रग्ज पेडलर महिला संगीत गोळेच्या पतीविरुद्ध तामलवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामुळे आता आरोपींची संख्या बारावर पोहोचली असून यापैकी सहाजण अटकेत तर उर्वरित सहा फरार आहेत. दरम्यान, यापैकी चौघांची नावे गोपनीय ठेवली आहेत.
तामलवाडी टोलनाका परिसरात ४५ ग्रॅम ड्रग्जसह तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्यावर गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी तपासला गती दिली. संबंधित आरोपींच्या चौकशीत ड्रग्ज पेडलर मुंबईतील एक महिला असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर विशेष पथकाने मुंबईत जावून पेडलर संगीता गोळे या महिलेस अटक केली. गोळे हिची कसून चौकशी केली असता, तिच्या एक वर्षाच्या मुलीचा सांभाळ करणारा मानलेला भाऊ संतोष खोत यास गुरुवारी रात्री अटक केली. शुक्रवारी त्यास १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.
तुळजापूर पंचायत समितीच्या माजी सभापतीचा मुलगा विश्वनाथ मुळे यास शुक्रवारी मध्यरात्री ठाण्यातून अटक करण्यात आली. शनिवारी त्यास पोलीस कस्टडी मिळाली असतानाच पेडलर महिला गोळेचा पती वैभव गोळे याच्याविरुद्धही शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. तो सध्या फरार आहे. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. तर सहा आरोपी फरार आहेत. यापैकी चौघांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. त्यांना कुठलीही क्षणी बेड्या पडू शकतात. प्रकरणाचा तपास गोकुळ ठाकूर हे करीत आहेत.