धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:12 IST2018-04-27T01:12:34+5:302018-04-27T01:12:34+5:30
तटकरे राष्ट्रीय कार्यकारिणीत : रविवारी होणार घोषणा

धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष?
अतुल कुलकर्णी ।
मुंबई : राष्टÑवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्टÑीय कार्यकारिणीत जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्या जागी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. २९ एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. तर प्रदेशाध्यक्ष पदासाठी २९ एप्रिल रोजी औपचारिक निवडणूक होत आहे. तटकरे हे चार वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष असून आपल्याला या पदातून मुक्त करा, अशी मागणी स्वत:हून त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.
नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी वित्तमंत्री आ. जयंत पाटील आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नावे चर्चेत असली तरी, तरुण ओबीसी चेहरा, फर्डे वक्तृत्व, धडाडी आणि संघटनकौशल्य या गुणांमुळे धनंजय मुंडे यांच्या नावाला पक्षनेतृत्वाकडून पसंती मिळण्याची शक्यता आहे. हल्लाबोल यात्रा आणि विधान परिषदेत मुंडे यांनी मंत्र्यांवर शेलके वार करून सरकारची कोंडी केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत तरुण नेतृत्वाला वाव मिळण्याची शक्यता आहे.
सत्ताधाºयांनी साम-दाम-दंड-भेद वापरून पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या परिस्थितीतही पक्ष मजबूत ठेवण्याचा प्रयत्न आपण केला. सलग ४ वर्षे हे पद सांभाळले असल्यामुळे माझा विचार न करता इतर सक्षम नेत्याचा विचार करावा, अशी मागणी आपणच पक्षाकडे केली आहे.
- सुनील तटकरे (प्रदेशाध्यक्ष, राष्टÑवादी काँग्रेस)