'उड गई विकास की चिडीया'... 'विकास वेडा झाला'नंतर काँग्रेसचा नवा नारा; ३५ लाख टी-शर्ट वाटणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 14:02 IST2018-07-12T14:02:00+5:302018-07-12T14:02:27+5:30
आगामी लोकसभा निवडणुका आणि छत्तीसगडसह इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यासाठी काँग्रेसकडून टी-शर्ट वापट मोहीम सुरू करण्यात आली आहे.

'उड गई विकास की चिडीया'... 'विकास वेडा झाला'नंतर काँग्रेसचा नवा नारा; ३५ लाख टी-शर्ट वाटणार
रायपूर - आगामी लोकसभा निवडणुका आणि छत्तीसगडसह इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यासाठी काँग्रेसने भाजप आणि मोदी सरकारविरुद्ध प्रचार मोहिमेला जोरदार सुरुवात केली आहे. मोदी सरकाराच्या विकास मुद्द्यावरुन काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भाजपविरुद्ध टी-शर्ट वॉर सुरु केले आहे. उड गई विकास की चिडीया असा सदेश लिहिलेले 1 लाख टी-शर्ट काँग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.
छत्तीसगडेमध्ये भाजपविरुद्ध प्रचार मोहिमेला तेथील विरोध पक्ष असलेल्या काँग्रेसने कल्पक सुरुवात केली. येथील काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांसाठी तब्बल 35 लाख टी-शर्ट छापण्याची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी एक लाख कार्यकर्त्यांना टी-शर्टचे वाटपही करण्यात आले. उड गई विकास की चिडीया असा संदेश या टी-शर्टवर लिहिण्यात आला आहे. याद्वारे भाजपकडून सातत्याने दावा करण्यात येणाऱ्या 'विकास मॉडेल'वर काँग्रेने प्रहार केला आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगावर हे टी-शर्ट दिसत असून तेथे हा विषय चर्चेचा बनला आहे.
पांढऱ्या टी-शर्टवर पिवळ्या आणि काळ्या रंगात हे डिझाईन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगावर हा टी-शर्ट पाहताच याबाबत चर्चा सुरू होते. आगामी काळात काँग्रेसकडून मतदारांनाही हे टी-शर्ट वाटण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, भाजपने या टी-शर्ट प्रचार मोहिमेवर टीका केली असून छत्तीसगडच्या गावागावात विकास झाल्याचे म्हटले आहे.