VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 10:50 IST2025-04-29T10:45:50+5:302025-04-29T10:50:01+5:30
हरियाणात पोलीस उपअधीक्षकांना एका भाजप नेत्याला अडवल्यामुळे सर्वांसमोर माफी मागावी लागली.

VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
Haryana Police: हरियाणामध्ये भाजप नेत्याला अडवल्यामुळे पोलीस अधिकाऱ्याला माफी मागावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे. माजी राज्यपालांचे पुत्र आणि भाजप नेते मनीष सिंगला यांना मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या कार्यक्रमात ओळखू न शकल्याने आणि माघारी पाठवल्यानंतर हा सगळा प्रकार घडला. पोलीस अधिकाऱ्याने भाजप नेते मनीष सिंगला याच्या शेजारी बसून माफी मागितली. या घटनेचा व्हिडीओ देखील काढला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून हरियाणातील भाजप सरकारवर टीका केली जात आहे.
मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या कार्यक्रमादरम्यान भाजप नेते सिंगला यांना स्टेजवर जाण्यापासून रोखणे पोलीस उपअधीक्षक जितेंद्र राणा यांना इतके महागात पडले की त्यांना माफी मागायला लावली. सिरसा येथील मुख्यमंत्री सैनी यांच्या कार्यक्रमादरम्यान माजी राज्यपाल गणेशीलाल यांचे पुत्र मनीष सिंगला यांना कार्यक्रमातून बाहेर काढण्याच्या घटनेबद्दल पोलीस उपअधीक्षकांनी माफी मागितली. पोलीस अधिकारी माफी मागत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिस अधिकाऱ्याने अशा प्रकारची जाहीर माफी मागितल्याने टीका देखील केली जात आहे.
हरियाणातील सिरसा येथे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचा कार्यक्रम होता. यावेळी स्थानिक भाजप नेते मनीष सिंगला देखील उपस्थित होते आणि ते मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठाकडे जाऊ लागले. तेव्हा तिथे उपस्थित असलेले पोलीस उपअधीक्षक जितेंद्र राणा यांनी त्यांना थांबवले. भाजप नेत्याला या छोट्याशा प्रकरणामुळे अपमानीत झाल्याचे वाटले आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्याने माफी मागितल्यानंतरच हा वाद संपवला. व्हिडिओमध्ये जितेंद्र सिंह राणा यांनी त्यांच्या वर्तनाबद्दल माफी मागितली आहे. मनीष सिंगला यांनी जितेंद्र सिंग राणा यांना माफ करत सांगितले की, जे काही घडले ते अनावधानाने झाले आणि आता कोणतीही तक्रार नाही.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातून बाहेर काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनीष सिंगला यांनी पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. मयंक गुप्ता यांनी प्रकरण सोडवण्यासाठी पोलीस उपअधिक्षक जितेंद्र राणा आणि मनीष सिंगला यांना पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊसमध्ये बोलावले होते. तिथेच जितेंद्र राणा यांनी मनीष सिंगला यांच्यासोबत बैठक घेतली आणि माफी मागितल्याचा व्हिडिओ जारी केला.
क्या हाल बना दिया है मेरे देश की पुलिस का?
— Srinivas BV (@srinivasiyc) April 28, 2025
भाजपा के नेता जी के अहंकार को ठेस क्या पहुंची, कानून के रखवालों से कैमरे के सामने 'सॉरी' बुलवाया जा रहा है!
हरियाणा के CM @NayabSainiBJP के कार्यक्रम में सिक्योरिटी प्रोटोकॉल निभाते हुए DSP जींद ने बीजेपी नेता मनीष सिंगला को नहीं… pic.twitter.com/7blWiegZKD
"मी त्यांना ओळखू शकलो नाही"
"मी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओबद्दल बोलू इच्छितो. मी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये होतो. सिरसा येथे एक कार्यक्रम होता आणि जेव्हा मनीष सिंघल स्टेजवर पोहोचले तेव्हा मी त्यांना इतर लोकांसह परत जाण्यास सांगितले. मी त्यांना ओळखू शकलो नाही. त्यांचा सन्मान दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. जर मनीषजी माझ्या कृतीमुळे दुखावले गेले असतील तर मी त्यांची माफी मागतो. मी माजी राज्यपाल आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा आदर करतो," असे पोलीस उपअधिक्षक जितेंद्र राणा यांनी म्हटलं.