उत्तरेत दाट धुक्यामुळे रेल्वे विस्कळीत; आठवडाभर धुक्याचे साम्राज्य; अन्य भागात हवामान सामान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 11:44 IST2025-12-28T11:43:55+5:302025-12-28T11:44:09+5:30
यामुळे रेल्वेस्थानकांवर गर्दी उसळली होती.

उत्तरेत दाट धुक्यामुळे रेल्वे विस्कळीत; आठवडाभर धुक्याचे साम्राज्य; अन्य भागात हवामान सामान्य
नवी दिल्ली : उत्तर भारतात दाट धुक्याने शनिवारी जनजीवन विस्कळीत झाले असून, याचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. राजधानी, दुरांतो आणि तेजससारख्या प्रीमियम रेल्वेही काही तास विलंबाने धावत होत्या. यामुळे रेल्वेस्थानकांवर गर्दी उसळली होती.
कडाक्याच्या थंडीचा इशारा
दरम्यान, उत्तरेत धुक्यासह अनेक राज्यांत कडाक्याची थंडी पडणार असून बिहार, उत्तराखंड, पूर्व-पश्चिम उत्तर प्रदेशात याचा अधिक प्रभाव असणार आहे. उत्तर राजस्थानच्या काही भागांतही ३० डिसेंबरपर्यंत थंडीची लाट असेल.
दिल्लीत थंडी-धुक्यासोबत प्रदूषणाने रोखला श्वास
राजधानी दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे अगोदरच हवालदिल झालेल्या नागरिकांना प्रदूषणाच्या आपत्तीचा सामना करावा लागत आहे.
शनिवारी सकाळी राजधानीच्या बहुतांश भागांत हवेची गुणवत्ता ४००हून अधिक एक्यूआय नोंदवली गेली. ही गंभीर ते अति गंभीर श्रेणी मानली जाते. राजधानीतील ३१ नोंदणी केंद्रांवर हवेची गुणवत्ता २७० ते ४०४ एक्यूआय इतकी नोंदली गेली. गेला संपूर्ण आठवडा दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर होती.
दृश्यमानता घटली
धुक्यामुळे उत्तरेत बहुतांश राज्यांत दृश्यमानता प्रचंड घटली असून, चंडीगडमध्ये काही भागांत दृश्यमानता शून्यावर आहे.
दिल्लीच्या काही भागांत ही दृश्यमानता ५० ते १०० मीटरपर्यंत कमी झाली आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणातही शनिवारी सकाळी धुक्यामुळे दृश्यमानता खूपच कमी असल्याने रस्त्यांवर वाहतूक संथ गतीने सुरू होती.
धुक्यामुळे दिल्ली, पाटणा, लखनौ, वाराणसी अशा विमानतळांवरून अनेक उड्डाणे विलंबाने झाली, तर काही रद्द करावी लागली.