स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्य करण्याची मागणी, आमदार राजू कागे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:18 IST2025-11-13T13:17:40+5:302025-11-13T13:18:30+5:30
अथणी/शिरगुप्पी : उत्तर कर्नाटकसाठी वेगळ्या राज्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. कागवाडचे आमदार राजू कागे यांनी मुख्यमंत्री ...

स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्य करण्याची मागणी, आमदार राजू कागे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अथणी/शिरगुप्पी : उत्तर कर्नाटकसाठी वेगळ्या राज्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. कागवाडचे आमदार राजू कागे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून वेगळ्या उत्तर कर्नाटकची मागणी केली आहे.
प्रादेशिक असमानतेवर तीव्र असंतोष व्यक्त करताना कागे म्हणाले की, विकासाच्या बाबतीत उत्तर कर्नाटक दक्षिण कर्नाटकपेक्षा मागे आहे. दक्षिणेला दाखवलेली विशेष काळजी उत्तरेला का दाखवली जात नाही? प्रत्येकजण कर्नाटक राज्याचा मुलगा आहे. तरीही सावत्र आईची वृत्ती का? या भागातील काही कार्यकर्ते भेदभाव दूर करावा किंवा वेगळे उत्तर कर्नाटक निर्माण करावे, अशी मागणी करत आहेत.
दिवंगत माजी मंत्री व हुक्केरीचे आमदार उमेश कट्टी यांनीही या मुद्द्यावर आवाज उठवला होता. तसेच, उत्तर कर्नाटक विकास वेदिकेअंतर्गत अजूनही संघर्ष सुरू आहे. दरम्यान, आमदार राजू कागे यांनीही राज्य सरकारला वेगळे उत्तर कर्नाटक निर्माण करण्याची विनंती केली आहे. त्यांनी यासंदर्भात ४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहिले. कागवाडचे आमदार राजू कागे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राचा विषय चर्चेचा बनला आहे.
पंधरा जिल्ह्यांच्या समावेशाची मागणी प्रशासकीय सोयीसाठी आणि व्यापक विकासासाठी, उत्तर कर्नाटकातील बिदर, कलबुर्गी, विजयपुरा, यादगीर, बागलकोट, बेळगाव, धारवाड, गडग, कोप्पल, रायचूर, उत्तर कन्नड, हवेरी, विजयनगर, बेल्लारी आणि दावणगेरे या १५ जिल्ह्यांचा समावेश असलेले एक नवीन राज्य स्थापन करावे, असे पत्रात म्हटले आहे.
पत्रात काय म्हटले आहे?
कर्नाटकच्या एकीकरणापासून या प्रदेशाला सर्व क्षेत्रात सतत अन्याय, भेदभाव आणि सापत्न वागणूक मिळत आहे. वेगळ्या राज्याच्या निर्मितीद्वारे आणखी एक कन्नडनाडू निर्माण होईल, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. उत्तर कर्नाटक ही सर्व संसाधनांनी समृद्ध भूमी आहे. उत्तर कर्नाटक संघर्ष समिती (आर) जनप्रतिनिधी स्वाक्षरी संकलन मोहिमेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. एक कोटीहून अधिक लोकांच्या स्वाक्षऱ्यांसह एक लेखी मत आधीच प्राप्त झाले आहे. राज्यपाल, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना एक पत्र लिहिले आहे.