खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 09:23 IST2025-08-01T09:21:25+5:302025-08-01T09:23:37+5:30
डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.

फोटो - आजतक
हरियाणातील फरिदाबादमधील भतौला गावात असलेल्या कंपनीच्या स्टोअरबाहेर एक दुःखद घटना घडली. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. स्टोअरबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना रेकॉर्ड झाली आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
डिलिव्हरी बॉय विकल सिंह हा फरिदाबादमधील सदपुरा गावचा रहिवासी होता. तो गेल्या एक वर्षापासून ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या कंपनीच्या स्टोअरमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तो त्याच्या सहकाऱ्यांसह दुकानाबाहेर खुर्चीवर बसला होता. बोलता बोलता विकल अचानक खुर्चीवरून खाली पडला.
इतर कर्मचाऱ्यांनी त्याला लगेचच उचललं आणि उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आता रिपोर्टची वाट पाहत आहे.
विकल सिंह हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावणारा सदस्य होता. त्याला ८ आणि ५ वर्षांच्या दोन मुली आहेत. विकलच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच संतप्त कुटुंबीयांनी कंपनीच्या दुकानाबाहेर गोंधळ घातला. परिस्थिती पाहून कंपनीने मृताच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच अंत्यसंस्कारासाठी ३०,००० रुपये देण्यात आले आहेत.
खेरी पुल पोलीस स्टेशनचे प्रभारी नरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आणि कुटुंबात ५ लाख रुपयांच्या भरपाईबाबत करार झाला आहे. जोपर्यंत ही रक्कम कुटुंबाला दिली जात नाही तोपर्यंत कंपनी विकलच्या पत्नीला दरमहा १०,००० रुपये देणार आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल असं पोलिसांचं म्हणणं आहे.