Delhi Violence: बंदूक रोखणारा 'तो' दंगलखोर गेला कुठे? दिल्ली पोलिसांची खळबळजनक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 12:14 IST2020-02-28T12:08:12+5:302020-02-28T12:14:20+5:30
Delhi Violence News: दिल्ली हिंसाचारात गोळीबार करणाऱ्या शाहरुखचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे

Delhi Violence: बंदूक रोखणारा 'तो' दंगलखोर गेला कुठे? दिल्ली पोलिसांची खळबळजनक माहिती
नवी दिल्ली - सीएए कायद्यावरुन दिल्लीतील मौजपूर, जाफराबाद भागात समर्थक आणि विरोधक भिडल्याने हिंसक आंदोलन पेटलं, जाळपोळ, दगडफेकीच्या घटनेने अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं. गाड्या जाळल्या, घरं जळाली, दुकानं लुटली, संपूर्ण बाजारपेठ जाळण्यात आली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काहींना घरं सोडावी लागली. या हिंसाचारात दगडफेक आणि जाळपोळ मोठ्या प्रमाणात झाली. आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.
ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारात एका तरुणाने पोलीस आणि जमावावर ८ राऊंड गोळीबार केला होता. इतकचं नाही तर त्या तरुणाने पोलिसाच्या अंगावर बंदूक रोखली होती. हा फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या तरुणाची ओळख पटली, सुरुवातीच्या बातमीनुसार शाहरुख नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती होती.
मात्र दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर शाहरुख अद्याप फरार आहे हे स्पष्ट झालं आहे. शाहरुखबद्दल कोणताही माहिती पोलिसांना मिळाली नाही, त्यामुळे शाहरुख अखेर गेला कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख दिल्लीतील उस्मापूर परिसरात अरविंद नगर गल्ली नंबर ५ मध्ये राहतो. सध्या त्याच्या घराबाहेर टाळे लावण्यात आलं आहे. आतापर्यंत शाहरुखचा सुगावा लागला नाही. त्याच्या कुटुंबाबाबतही कोणती माहिती नाही. त्याच्या कुटुंबात एक मोठा भाऊ आणि आई-वडील राहतात. सध्या संपूर्ण कुटुंब फरार आहे, त्यांच्याबद्दल कोणालाच काही माहिती नाही.
दिल्ली हिंसाचारात गोळीबार करणाऱ्या शाहरुखचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनेचा व्हिडिओ, फोटो व्हायरल होऊनही पोलिसांना काहीच माहिती मिळत नाही. काही दिवसांपूर्वी शाहरुखच्या अटकेची बातमी समोर येत होती. मात्र ही अफवा असल्याचं पोलिसांनी सांगितले. इतक्या दिवसानंतर पोलीस स्पष्टीकरण का देत आहे? हा प्रश्नही उपस्थित होतो. हिंसाचारामुळे दिल्लीतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यानंतरही शाहरुख फरार असणे दिल्ली पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित करणारे आहे.
शाहरुखच्या वडिलांचे नाव शावर पठाण आहे. त्यांचे कुटुंब १९८५ पासून दिल्लीत राहतं. ड्रग्स प्रकरणात दोनदा शाहरुखच्या वडिलांना जेलमध्ये जावं लागलं. अलीकडेच जेलमधून त्यांची सुटका झाली. शावर पठाण पहिल्यांदा सरदार होता असंही म्हटलं जात असे. यानंतर एका महिलेशी लग्न करुन त्याने धर्मांतर केल्याचं बोललं जातं.