प्रदूषणामुळे ऐन दिवाळीत दिल्लीकरांचा श्वास गुदमरला, एक्यूआय ४०० पार, रेड झोनमध्ये ३५ केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 07:23 IST2025-10-22T07:22:56+5:302025-10-22T07:23:56+5:30
आजच्या धुक्यामुळे आकाशच काळवंडले नाही तर मुलांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

प्रदूषणामुळे ऐन दिवाळीत दिल्लीकरांचा श्वास गुदमरला, एक्यूआय ४०० पार, रेड झोनमध्ये ३५ केंद्र
लोकमत न्यूज नेटवर्क. नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचा विचार करून हरित फटाके फोडण्यासाठी दोन तासांची वेळ निश्चित केली होती. मात्र, या वेळेमर्यादेचे उल्लंघन करून नागरिकांनी सोमवारी रात्री गरजेपेक्षा अधिक फटाके फोडले. त्यामुळे मंगळवारी सकाळी प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याने हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४०० पार झाल्याने दिल्लीतील हवा विषारी झाली.
मंगळवारी सकाळी दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) दाट राखाडी धूर पसरल्यामुळे दृश्यमानता घटली होती. राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी येथील एक्यूआय ४०९ नोंदवण्यात आला. वझीरपूर - ४०८, बवाना - ४३२, तर बुराडी येथील एक्यूआय ४०५ नोंदवण्यात आला.
रेड झोनमध्ये ३५ केंद्र समाविष्ट
दिल्ली संपूर्ण शहर एनसीआर क्षेत्रातील प्रदूषणात वाढ झाली. त्यामुळे एकूण ३८ निरीक्षण केंद्रांपैकी ३५ केंद्रांवरील हवेची गुणवत्ता रेड झोनमध्ये नोंदवली गेली. हवेची गुणवत्ता नोंदवणाऱ्या समीर ॲपनुसार ३१ केंद्रांवर हवेची गुणवत्ता अंत्यत वाईट व चार केंद्रांवर गंभीर श्रेणीत नोंदवण्यात आली.
वाढते प्रदूषण ही आहे धोक्याची घंटा
दिल्लीतील प्रत्येक निरीक्षण केंद्र आता रेड झोनमध्ये गेले आहे. संपूर्ण शहराचा एक्यूआय ३०० पार झाला आहे. त्यामुळे वाढते प्रदूषण शहरासाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ भाव्रीण कंधारी यांनी नमूद केले. आजच्या धुक्यामुळे आकाशच काळवंडले नाही तर मुलांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.