दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 10:26 IST2025-12-19T10:25:32+5:302025-12-19T10:26:33+5:30
Delhi Pollution: दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी चीनने ३००० मोठे उद्योग हटवण्याचा सल्ला दिला आहे. बीजिंग मॉडेलचा वापर करून दिल्लीची हवा कशी सुधारेल? वाचा सविस्तर वृत्त.

दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
देशाची राजधानी दिल्ली सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, यावर उपाय शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून सल्ले दिले जात आहेत. आता चीनने दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक टोकाचा उपाय सुचवला आहे. चीनच्या मते, दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील सुमारे ३,००० अवजड उद्योग कायमचे बंद केले पाहिजेत किंवा ते शहराबाहेर स्थलांतरित केले पाहिजेत, असे चीनने सुचविले आहे.
काही वर्षांपूर्वी चीन देखील अशाच परिस्थितीला समोरा जात होता. चीनची राजधानी बीजिंग देखील विषारी वायुंच्या विळख्यात अडकली होती. तेथील प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आले आहे. आता जे चीनने कठोरपणे केले ते भारतात करण्यात यावे असे चीन भारताला सुचवत आहे.
बीजिंग मॉडेलचा दाखला
चीनने हा सल्ला आपल्या अनुभवावरून दिला आहे. २००८ च्या ऑलिम्पिक वेळी बीजिंगमध्येही प्रदूषणाची अशीच भीषण समस्या होती. त्यावेळी चीन सरकारने बीजिंगमधील हजारो कारखाने शहराबाहेर हलवले होते आणि कोळशावर आधारित प्रकल्पांवर बंदी घातली होती. दिल्लीनेही अशाच प्रकारे 'कठोर' निर्णय घेतल्याशिवाय प्रदूषणापासून सुटका मिळणार नाही, असे चीनचे म्हणणे आहे.
चीनच्या प्रस्तावातील महत्त्वाचे मुद्दे:
दिल्लीतील ३,००० हून अधिक प्रदूषणकारी कारखान्यांची यादी करून ते तातडीने बंद करणे. जुन्या वाहनांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालून ई-वाहनांना प्रोत्साहन देणे. कोळशाचा वापर करणाऱ्या उद्योगांना पर्यायी ऊर्जा स्रोतांकडे वळवणे. प्रदूषण नियंत्रणासाठी बीजिंगप्रमाणे 'स्मॉग टॉवर्स' आणि हाय-टेक एअर प्युरिफायरचा वापर करणे.
भारताची भूमिका काय?
भारतीय तज्ज्ञांच्या मते, चीनचा हा सल्ला तांत्रिकदृष्ट्या प्रभावी असला तरी, भारतासारख्या लोकशाही देशात ३,००० उद्योग एका रात्रीत बंद करणे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या कठीण आहे. यामुळे लाखो लोकांचा रोजगार जाण्याची भीती आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार आता उद्योगांचे वर्गीकरण करून प्रदूषण कमी करण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यावर विचार करत आहे.