६ वर्षांच्या चिमुकल्यावर पिटबुलचा हल्ला; चावल्यामुळे कान तुटला, चेहरा व डोक्यावर जखमा; मालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:52 IST2025-11-25T15:27:00+5:302025-11-25T15:52:55+5:30
दिल्लीत पिटबुल श्वानाच्या हल्ल्यात सहा वर्षांचा मुलगा गंभीर झाला.

६ वर्षांच्या चिमुकल्यावर पिटबुलचा हल्ला; चावल्यामुळे कान तुटला, चेहरा व डोक्यावर जखमा; मालकाला अटक
Delhi Dog Bite:दिल्लीतील प्रेम नगर परिसरातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका पिटबुल जातीच्या पाळीव कुत्र्याने घराबाहेर खेळणाऱ्या सहा वर्षांच्या निरागस मुलावर जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात मुलाचा उजवा कान पूर्णपणे छाटला गेला असून, त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि शरीरावर १० हून अधिक गंभीर जखमा झाल्या आहेत. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, मुलाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
ही घटना २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, ६ वर्षांचा चिमुकला आपल्या मोठ्या भावासोबत गल्लीत खेळत होता. त्यांचा चेंडू शेजाऱ्याच्या घराकडे गेला आणि तो उचलण्यासाठी मुलगा जात असतानाच पिटबुलने अचानक धावत येऊन त्याच्यावर हल्ला केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, मुलाकडे पिटबुल धाव येताना दिसतो. मुलाला वाचवण्याचा प्रयत्न एक महिला करते, पण ती कुत्र्याला रोखू शकत नाही. कुत्र्याने मुलाला खाली पाडून त्याला चावा घेण्यास सुरुवात केली आणि त्याचा उजवा कान पूर्णपणे तोडून टाकला.
या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मोठ्या प्रयत्नाने त्यांनी मुलाला पिटबुलच्या तावडीतून वाचवले. मुलाच्या शरीरातून रक्तस्राव होत होता आणि त्याचा कान पूर्णपणे कापला गेला होता. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र जखमा गंभीर असल्याने त्याला सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले आहे, जिथे त्याची प्रकृती अजूनही नाजूक आहे.
कुत्र्याच्या मालकाला अटक, पूर्वीही केले होते हल्ले
पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत पिटबुलचा मालक राजेश पाल (वय ५०) याला अटक केली आहे. तो पेशाने शिंपी आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २९१ आणि कलम १२५(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, पिटबुलने यापूर्वीही परिसरातील ४ ते ५ मुलांवर हल्ला केला होता. त्यांनी अनेकदा कुत्र्याला पकडण्याची मागणी केली होती, पण मालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. पोलिसांनी महापालिकेच्या टीमच्या मदतीने पिटबुल कुत्र्याला ताब्यात घेऊन शेल्टर होममध्ये पाठवले आहे.