Delhi Horror: त्या तरुणीवर अत्याचार झाला होता की नाही? मृत्यू कसा झाला, पोस्टमार्टेममधून धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 17:14 IST2023-01-03T16:40:35+5:302023-01-03T17:14:09+5:30
Delhi Horror: कारसोबत फरफटत नेल्याने पीडित तरुणीचा मृत्यू झाला होता. तसेच तिचे छिन्नविछिन्न स्थितीमधील शरीर सापडले होते. या तरुणीवर अत्याचार झाल्याची शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. दरम्यान, या मृत तरुणीच्या मृतदेहाचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला आहे.

Delhi Horror: त्या तरुणीवर अत्याचार झाला होता की नाही? मृत्यू कसा झाला, पोस्टमार्टेममधून धक्कादायक माहिती समोर
राजधानी दिल्लीमध्ये नववर्षाच्या सुरुवातीला एका तरुणीला अपघातानंतर कारमधील तरुणांनी फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेत पीडित तरुणीचा मृत्यू झाला होता. तसेच तिचे छिन्नविछिन्न स्थितीमधील शरीर सापडले होते. या तरुणीवर अत्याचार झाल्याची शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. दरम्यान, या मृत तरुणीच्या मृतदेहाचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार या तरुणीचं लैंगिक शोषण झालं नव्हतं. मात्र तिच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा सापडल्या. पण तिच्या गुप्तांगावर लैंगिक अत्याचारांना दुजोरा देतील, अशा कुठल्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा नव्हत्या.
दिल्लीतील या २० वर्षीय तरुणीच्या स्कुटीला एका कारने धडक दिली होती. त्यानंतर या कारमधील तरुण तिला सुमारे १२ किमीपर्यंत फरफटत घेऊन गेले होते. त्यामुळे या तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलियसांनी या प्रकरणात कारमधील पाच जणांना सोमवारी अटक केली होती. दरम्यान, भीषण अपघातामुळेच अंजलीला अनेक गंभीर जखमा झाल्या आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असे संकेत पोस्टमार्टेम रिपोर्टमधून मिळत आहेत. अंजलीच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर जखमा झाल्याचे पोस्टमार्टेममधून समोर आले आहे.
मात्र पीडित तरुणीच्या आईसह इतर नातेवाईकांनी या कार अपघाताला मृत्यूचं कारण मानण्यास नकार दिला होता. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शंका व्यक्त केली होती. त्यानंतर मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये एका मेडिकल बोर्डाने सोमवारी तरुणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्याचा रिपोर्ट आज पोलिसांना सोपवण्यात आला आहे.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीच्या संपूर्ण शरीरावर जखमांच्या खुणा सापडल्या आहेत. मात्र तिच्या गुप्तांगावर जखमांच्या खुणा आढळलेल्या नाहीत, असे पोस्टमार्टेममध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र पोलिसांनी खबरदारी म्हणून पीडितेचे जिन्स आणि स्वॅब सुरक्षित ठेवले आहेत.