"माझ्या पत्नी आणि बहिणीविषयी..."; समीर वानखेडेंच्या मानहानी प्रकरणात कारवाई, हायकोर्टात काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:50 IST2025-10-08T13:49:41+5:302025-10-08T13:50:29+5:30
दिल्ली हायकोर्टाने समीन वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना रेड चिलीजला नोटीस पाठवली आहे.

"माझ्या पत्नी आणि बहिणीविषयी..."; समीर वानखेडेंच्या मानहानी प्रकरणात कारवाई, हायकोर्टात काय घडले?
Delhi High Court Summon to Red Chilles Entertainment: आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खानची कंपनी रेड चिलीज आणि नेटफ्लिक्स यांना नोटीस बजावली आहे. समीर वानखेडे यांनी नेटफ्लिक्सवरच्या द बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड नावाच्या वेब सीरिजमुळे त्यांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा खराब झाल्याचा आरोप केला आहे. न्यायाधीश पुरूषेंद्र कुमार कौर यांनी रेड चिलीज, नेटफ्लिक्स, एक्स कॉर्प, गुगल, मेटा आणि इतर कंपन्यांना समन्स बजावून सात दिवसांच्या आत त्यांचे उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
समीर वानखेडे यांनी कोर्टाला सांगितले की, या वेब सीरिजमुळे मला, पत्नीला आणि बहिणीला ट्रोल करणाऱ्या पोस्ट केल्या जात आहे. त्या पोस्ट बदनामीकारक आहेत आणि हे धक्कादायक आहे. यावर कोर्टाने, आम्ही मान्य करतो की तुमच्या बाजूने न्यायालयात येण्याचे एक कारण आहे, पण तुम्हाला एक विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, असं म्हटलं. समीर वानखेडे यांच्या वतीने वरिष्ठ वकील संदीप सेठी यांनी बाजू मांडली. तक्रारीत सुधारणा करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे, असं संदीप सेठी यांनी म्हटलं. वानखेडे यांच्या वकिलांनी न्यायालयाला माहिती दिली की त्यांचा खटला दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येतो.
या खटल्यात प्रोडक्शन हाऊस आणि इतरांविरुद्ध कायमस्वरूपी आणि अनिवार्य मनाई आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच वानखेडे यांनी २ कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे, जी ते कर्करोगाच्या रुग्णांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला द्यायची आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होईल.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची वेब सीरिज द बॅडीज ऑफ बॉलीवूड सध्या बरीच चर्चेत आहे. या वेब सीरिजच्या भागात समीर वानखेडेंसारखा दिसणारा एक अधिकारी आहे. त्यामुळे यात आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख अधिकारी समीर वानखेडे यांची खिल्ली उडवल्याची चर्चा सुरु आहे. याबद्दल वानखेडे यांचा असा युक्तिवाद आहे की ही वेब सीरिज केवळ त्यांनाच चुकीचे दाखवत नाहीये तर ड्रग्जविरुद्ध काम करणाऱ्या यंत्रणेचे नकारात्मक चित्रण देखील करतेय. ही वेब सीरिज जाणूनबुजून वानखेडे यांची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी तयार करण्यात आली होती असाही दावा याचिकेत आहे.
दरम्यान, समीर वानखेडे यांनी मालिकेची निर्मिती कंपनी, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्सविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात समीर वानखेडे यांना उलट सवाल केला आहे.