मुसळधार पावसामुळे दिल्लीतीच परिस्थिती बिघडू लागली आहे. यमुना नदीची पाणी पातळी वाढली असून २०१३ च्या पातळीला पार केले आहे. यामुळे या पुरापासून वाचण्यासाठी ज्या भागात पुरग्रस्तांसाठी टेंट उभारले होते त्यातही पाणी घुसले आहे. यामुळे या ठिकाणी आसऱ्यासाठी आलेल्या लोकांना पुन्हा दुसरीकडे हलविण्यात आले आहे.
बुधवारी संध्याकाळपर्यंत पाण्याची पातळी २०७.३३ मीटरवर पोहोचली आहे. यमुना बाजार परिसरात मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. त्यातही पाणी घुसले आहे. यामुळे दिल्लीच्या सखल भागात पुराचा धोका आणखी वाढला आहे.
प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याचे आणि नदीकाठच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. वझिराबाद आणि ओखला बॅरेजमधून जर जास्त पाणी सोडले गेले तर दिल्लीत हाहाकार उडण्याची शक्यता आहे. रात्री ८ नंतरही पाण्याची पातळी वाढू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी तीनवेळा यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. १९७८ - २०७.४९ मीटर, २०१३ - २०७.३२ मीटर आणि २०२३ - २०८.६६ मीटर एवढी पाणी पातळी नोंदविली गेली होती.
गेल्या २४ तासांत वरच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे यमुनेतील पाण्याचा प्रवाह वेगाने वाढला असून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.