Delhi Election Results : भाजपा नेत्यांची वादग्रस्त विधाने भोवली, अमित शाह यांनी चूक कबूल केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 21:09 IST2020-02-13T21:05:05+5:302020-02-13T21:09:01+5:30
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची कारणमीमांसा केली आहे.

Delhi Election Results : भाजपा नेत्यांची वादग्रस्त विधाने भोवली, अमित शाह यांनी चूक कबूल केली
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर आता भाजपाने या पराभवाबाबत चिंतन करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या पराभवाची नेमकी कारणमीमांसा केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाचे नुकसान झाल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे.
इंग्रजी वृत्तवाहिनी टाइम्स नाऊच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी भाजपाच्या दिल्लीत झालेल्या पराभवाबाबत भाष्य केले आहे. भाजपाच्या नेत्यांनी देशातील गद्दार आणि भारत-पाकिस्तान मॅच यासारखी विधाने करता कामा नये होती, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. दिल्ली निवडणुकीतील प्रचारादरम्यान, भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी 'देश के गद्दारो... असे वक्तव्य केले होते.
दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांची जेवढी चर्चा केली गेली, त्या तुलनेत राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यांची चर्चा झाली नाही, असा दावाही अमित शाह यांनी केला. दरम्यान, काही निवडणुकांमध्ये पराभव झाला म्हणजे जनतेचा पक्षावरील विश्वास उडाला असे होत नाही. महाराष्ट्रात आम्ही जिंकलो होतो. हरयाणात आम्ही केवळ ६ जागा गमावल्या. नक्कीच झारखंडमध्ये आमचा पराभव झाला. तर दिल्लीच आम्ही आधीच पराभूत झालो होतो. मात्र दिल्लीत आमच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढली, असेही अमित शाह यांनी यावेळी सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून, ७० सदस्य संख्या असलेल्या दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल यांच्या आपने ६२ जागा जिंकून दणदणीत यश मिळवले. तर भाजपाला केवळ ८ जागाच जिंकत आल्या होता.