Delhi Election 2025: दिल्लीत 70 जागांसाठी आज मतदान, 699 उमदेवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 05:56 IST2025-02-05T05:56:06+5:302025-02-05T05:56:49+5:30
Delhi voting updates: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. ७० जागांवर ६९९ उमेदवार रिंगणात असून, आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत दिल्लीत होत आहे.

Delhi Election 2025: दिल्लीत 70 जागांसाठी आज मतदान, 699 उमदेवार रिंगणात
Delhi Assembly Election 2024: तिरंगी लढत होत असलेल्या दिल्लीत आज ७० जागांसाठी मतदान होत आहे. बुधवारी सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरू होऊन सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. दिल्लीतील मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ६९९ उमेदवारांच्या भवितव्याचा कौल आज मतदान यंत्रातून देतील. आप समोर पुन्हा एकदा सत्ता राखण्याचे आव्हान आहे. तर भाजप आणि काँग्रेसनेही दिल्लीत सत्तेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांसाठी १३,७६६ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी आपल्या कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे. दुसरीकडे २५ वर्षांहून अधिक काळ दिल्लीतील सत्तेतून बाहेर असलेल्या भाजपने यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावल्याचे दिसत आहे.
आम आदमी पक्षाचे दिल्लीत सरकार येण्यापूर्वी काँग्रेसकडे १५ वर्ष दिल्लीत सत्ता होती. पण, गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे.
१.५६ कोटी मतदार
५ फेब्रुवारी रोजी १.५६ कोटी मतदार १३,७६६ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी ८३.७६ लाख पुरुष, ७२.३६ लाख महिला आणि १,२६७ तृतीयपंथी मतदार आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी घरपोच मतदान सुविधेअंतर्गत ७,५५३ पात्र मतदारांपैकी ६,९८० मतदारांनी आधीच मतदान केले आहे.
मतदान शांततेत पार पडण्यासाठी कडक बंदोबस्त
निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी खबरदारी घेतली आहे. यासाठी सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या २२० तुकड्या, दिल्ली पोलीस विभागातील ३५,६२६ अधिकारी आणि कर्मचारी आणि १९००० होमगार्ड विविध मतदान केंद्रावर आणि शहरात तैनात करण्यात आले आहेत.
३००० मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. तिथे कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया पार पडताना पोलीस ड्रोनच्या मदतीनेही नजर ठेवणार आहे.