दिल्लीत भाजपाची घोडदौड थांबली, आपचं जोरदार पुनरागमन, लढत रंगतदार स्थितीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 10:21 IST2025-02-08T10:21:08+5:302025-02-08T10:21:51+5:30
Delhi Election 2025 Results Live Update: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे दोन तास पूर्ण झाले असून, सुरुवातीच्या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारत ५० जागांवर आघाडी घेणाऱ्या भाजपाची आता काहीशी पिछेहाट सुरू झाली आहे. तर सुरुवातीला मोठ्या फरकाने पिछाडीवर दिसत असलेल्या आपने पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.

दिल्लीत भाजपाची घोडदौड थांबली, आपचं जोरदार पुनरागमन, लढत रंगतदार स्थितीत
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे दोन तास पूर्ण झाले असून, सुरुवातीच्या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारत ५० जागांवर आघाडी घेणाऱ्या भाजपाची आता काहीशी पिछेहाट सुरू झाली आहे. तर सुरुवातीला मोठ्या फरकाने पिछाडीवर दिसत असलेल्या आपने पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. सध्याच्या कलांमध्ये भाजपा ३९ तर आप ३० आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.
मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये निर्विवाद यश मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाला यावेळी भाजपाने जोरदार टक्कर दिली होती. तर काँग्रेसही आक्रमकपणे विरोधात उभी राहिल्याने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याचे संकेत मिळत होते. त्यातच मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून आम आदमी पक्षाच्या पराभवाचं भाकित करण्यात आलं होतं.
दरम्यान, आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजपाने जोरदार आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. एकवेळ भाजपाने दिल्लीतील ७० जागांवरील कल समोर आले तेव्हा ५० जागांवर आघाडी घेतली होती. तर आम आदमी पक्षाची १९ जागांपर्यंत पिछेहाट झाली होती. मात्र मतमोजणीच्या दुसऱ्या तासात आम आदमी पक्षाचं पुनरागमन होताना दिसत असून, आता आपने बऱ्याच मतदारसंघातील पिछाडी भरून काढली आहे. सद्यस्थितीत भाजपा ३९ तर आप ३० जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान, सुरुवातीच्या कलांमध्ये दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक नेते पिछाडीवर पडले होते. तर आपचं प्रभावक्षेत्र असलेल्या अनेक मतदारसंघात भाजपाला आघाडी मिळताना दिसत होती.