रुग्णासोबत आल्याचे सांगून घरात घुसले अन्...; डॉक्टरची निर्घृण हत्या, धक्कादायक कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 14:43 IST2024-05-11T14:39:57+5:302024-05-11T14:43:24+5:30

दिल्लीतल्या उच्चभ्रू परिसरात एका डॉक्टरची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

Delhi crime news Doctor brutally murdered dead body found in the kitchen | रुग्णासोबत आल्याचे सांगून घरात घुसले अन्...; डॉक्टरची निर्घृण हत्या, धक्कादायक कारण समोर

रुग्णासोबत आल्याचे सांगून घरात घुसले अन्...; डॉक्टरची निर्घृण हत्या, धक्कादायक कारण समोर

Delhi Crime : दिल्लीतून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. दिल्लीच्या उच्चभ्रू परिसरात एका वृद्ध डॉक्टरची दिवसाढवळ्या अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. राहत्या घरात वृद्ध डॉक्टरचा मृतदेह आढळून आला. डॉक्टरचे हात-पाय बांधलेले होते. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी डॉक्टरची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. . रुग्णाचे नातेवाईक असल्याचे सांगत आरोपींनी घरात प्रवेश केला आणि डॉक्टरची हत्या केली. 

दिल्लीच्या जंगपुरा भागात भागात राहणारे ६३ वर्षीय डॉ. योगेश चंद्र पॉल यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना योगेश यांचा मृतदेह घरातील स्वयंपाकघरात आढळून आला. योगेश चंद्र पॉल हे सामान्य डॉक्टर होते आणि त्यांची पत्नी डॉ. नीना पॉल या देखील  दिल्लीच्या सरकारी रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होत्या. प्राथमिक तपासात ही हत्या दरोड्याच्या उद्देशाने झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलिसांना संध्याकाळी गुरुवारी सहाच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून डॉक्टरचा मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान योगेश दुपारी एकच्या सुमारास दवाखान्यातून जेवणासाठी घरी आले होते. या वेळी ३ ते ४ आरोपी रुग्णाचे नातेवाईक असल्याचे सांगत डॉक्टर योगेश यांच्या घरात घुसले. आरोपींनी डॉक्टरचे हात-पाय बांधून बेल्टने गळा आवळून त्यांचा खून केला. यानंतर आरोपींनी घरातून मौल्यवान ऐवज घेऊन पळू काढला.

हा सगळा प्रकार घडला त्यावेळी डॉक्टर योगेश यांची पत्नी घरी नव्हती. संध्याकाळी सहाच्या सुमारास डॉक्टरची पत्नी घरी आल्या तेव्हा त्यांना योगेश हे स्वयंपाकघरात हात पाय बांधलेल्या अवस्थेत दिसले. त्यांचे पाळीव कुत्रे बाथरूममध्ये बंद होते. घरात तोडफोड आणि लुटमार केल्याचे दिसत होते. पोलिसांनी घराबाहेर लावलेले सीसीटीव्ही तपासले असता फुटेजमध्ये दुपारी दीडच्या सुमारास चार जण घरात शिरताना दिसत आहेत.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत. पोलिसांकडून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. 
 

Web Title: Delhi crime news Doctor brutally murdered dead body found in the kitchen