दिवसाढवळ्या ज्वेलरी शॉपवर दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत ५० लाख रुपयांचे दागिने लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 17:23 IST2026-02-25T17:22:48+5:302026-02-25T17:23:21+5:30
Delhi Crime: दरोडेखोरांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना.

दिवसाढवळ्या ज्वेलरी शॉपवर दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत ५० लाख रुपयांचे दागिने लुटले
Delhi Crime: राजधानी दिल्लीतील गजबजलेल्या चांदणी चौक परिसरात बुधवारी(दि.२५) दिवसाढवळ्या झालेल्या लूटमारीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. किनारी बाजारातील गली अनारवाली येथे असलेल्या एका ज्वेलरी दुकानात दरोडेखोरांनी थेट बंदुकीच्या धाकाने लूट केली. या लुटीत सुमारे ५० लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
‘रिया गोल्ड’ ज्वेलर्सवर दरोडा
मिळालेल्या माहितीनुसार, गली अनारवाली परिसरात ‘रिया गोल्ड’ नावाचे ज्वेलरी दुकान आहे. बुधवारी दुपारी दुकानात ग्राहकांची वर्दळ सुरू असतानाच दरोडेखोर ग्राहक बनून दुकानात दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी कर्मचार्यांशी थोडी चर्चा केली आणि अचानक बंदुका काढून सर्वांना गन पॉइंटवर घेतले.
काही क्षणातच परिस्थिती गंभीर बनली. दरोडेखोरांनी कर्मचार्यांना धमकावत, जे काही दागिने आहेत ते सगळे बाहेर काढा, असे सांगितले. जीवाच्या भीतीपोटी कर्मचार्यांनी दुकानातील दागिने त्यांच्या हवाली केले. त्यानंतर दरोडेखोर सुमारे 50 लाखांचे दागिने घेऊन पसार झाले.
पोलिसांची तत्काळ कारवाई
दरोडेखोर निघून गेल्यानंतर घाबरलेले कर्मचारी दुकानाबाहेर आले आणि तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच चांदणी चौक पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तपास सुरू केला. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत.
गजबजलेल्या बाजारात लूट, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
दिवसाढवळ्या आणि अत्यंत गजबजलेल्या बाजारपेठेत झालेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चांदणी चौकसारख्या ठिकाणी दिवसभर प्रचंड गर्दी असते, तरीही बदमाशांनी इतक्या धाडसाने लूट केल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके
पोलिसांनी लूटमारीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींची ओळख पटवण्यासाठी, पळून जाण्याचे मार्ग शोधण्यासाठी आणि लुटलेले दागिने हस्तगत करण्यासाठी विशेष तपास पथके तैनात करण्यात आली आहेत.