दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांचे पती काय करतात? 'या' व्यवसायातून मिळते प्रचंड उत्पन्न...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:46 IST2025-02-20T18:46:17+5:302025-02-20T18:46:38+5:30
Delhi CM Rekha Gupta Husband Net Worth: रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांचे पती काय करतात? 'या' व्यवसायातून मिळते प्रचंड उत्पन्न...
Delhi CM Rekha Gupta : भाजप नेत्या रेखा गुप्ता यांनी आज(20 फेब्रुवारी 2024) दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 6 कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच विजयी झालेल्या रेखा गुप्ता यांच्या गळ्यात थेट दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. दरम्यान, रेखा गुप्ता यांच्याविषयी लोकांना फारशी माहिती नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्या कुटुंबाची माहिती देणार आहोत.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे पती काय करतात?
रेखा गुप्तांचे पती मनीष गुप्ता यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, ज्यातून ते भरपूर कमाई करतात. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्री बनलेल्या रेखा गुप्ता यांनी स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 5.31 कोटी रुपये असल्याचे घोषित केले आहे. यामध्ये त्यांच्याकडे 1.26 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 2.30 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. मनीष गुप्ता यांच्याकडे एकूण 1.14 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 30 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
कमाईच्या बाबतीतही पुढे
आता वार्षिक कमाईबद्दल बोलायचे झाले, तर रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता त्यांच्यापेक्षा पुढे आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात रेखा गुप्ता यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 6.92 लाख रुपये होते, तर त्यांचे पती मनीष गुप्ता यांचे उत्पन्न 97.33 लाख रुपये होते. मागील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये त्यांचे उत्पन्न 64.56 लाख रुपये होते, तर रेखा गुप्ता यांचे उत्पन्न 4.87 लाख रुपये होते.
मनीष गुप्ता यांचा व्यवसाय
मनीष गुप्ता कोटक लाइफ इन्शुरन्समध्ये एजन्सी सहयोगी आहेत आणि निकुंज एंटरप्राइझ अंतर्गत व्यवसाय करतात. त्यांचा स्पेअर पार्ट्सचाही मोठा बिझनेस आहे, ज्यातून ते भरपूर कमाई करतात.
शेअर मार्केट आणि LIC मध्ये गुंतवणूक
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि त्यांच्या पतीने शेअर बाजारात लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. रेखा गुप्ता यांच्या पोर्टफोलिओमध्ये केशव को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे 200 शेअर्स, हिंदुस्थान समाचार लिमिटेडचे 100 शेअर्स आहेत, तर त्यांचे पती मनीष गुप्ता यांनीही केशव को-ऑपरेटिव्ह बँकेचे 200 शेअर्स खरेदी केले आहेत. याशिवाय त्यांनी NPS मध्ये 1.80 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. दुसरीकडे, रेखा गुप्ता यांच्या नावावर पाच विमा पॉलिसी आहेत, तर त्यांच्या पतीच्या 11 विमा पॉलिसी आहेत. दोघांची एलआयसीसह इतर कंपन्यांच्या पॉलिसींमध्ये एकूण 53.68 लाख रुपयांची गुंतवणूक आहे.