दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:28 IST2025-12-03T15:27:12+5:302025-12-03T15:28:21+5:30
दिल्ली स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या जसीर बिलाल वानी याच्या कोठडीत आता आणखी ७ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय?
दिल्लीत झालेल्या कारस्फोटाने अवघ्या देश हादरवून सोडला. या स्फोटात तब्बल १५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या जसीर बिलाल वानी याच्या कोठडीत आता आणखी ७ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. जसीर बिलाल सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. दिल्लीच्या एका विशेष न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. २७ नोव्हेंबर रोजी अटक झाल्यानंतर जसीर बिलाल वानीला, प्रधान स्तर आणि जिल्हा न्यायाधीश अंजु बजाज चंदना यांच्या न्यायालयाने ७ दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले होते. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथील रहिवासी असलेल्या जसीर वानीवर अतिशय गंभीर आरोप आहेत.
जसीर बिलाल वानी याने दिल्ली लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या आधी ड्रोनमध्ये काही तांत्रिक बदल करून त्यात स्फोटके लपवून स्फोट घडवण्याची योजना आखली होती. इतकंच नाही, तर त्याने रॉकेट बनवण्यामध्ये व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलला तांत्रिक मदत पुरवल्याचा आरोप देखील जसीर वानी याच्यावर आहे. देशात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये देखील जसीर बिलाल वानी याचे नाव समोर आले आहे. अनेक देशघातकी कटांमध्ये तो सामील होता. दिल्ली कार स्फोट प्रकरणात आतापर्यंत ७ लोकांना अटक करण्यात आली आहे.
एनआयएने जसीर हा दिल्ली कार स्फोट घडवून आणणाऱ्या डॉ. उमर याचा जवळचा सहकारी असल्याचे म्हटले आहे. डॉ. उमर उन नबी याच्यासोबत जसीर बिलाल यानेही या हल्ल्याची योजना तयार केली होती. एनआयएने १७ नोव्हेंबर रोजी जसीर बिलाल वानी उर्फ दानिश याला श्रीनगरमधून अटक केली होती.
त्याने चौकशीदरम्यान सांगितले की, लाल किल्ल्यावर बॉम्बस्फोट घडवणारा बॉम्बर डॉ. उमर याने त्याचे अनेक महिने ब्रेनवॉशिंग केले होते. डॉ. उमरने जसीर बिलाल वानीला आत्मघाती बॉम्बर बनण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. या वर्षी एप्रिलमध्ये जसीर बिलाल वाणीने इस्लाममध्ये आत्महत्या निषिद्ध असल्याचे कारण देत आत्मघाती बॉम्बर बनण्यास नकार दिल्याने डॉ. उमरचे प्रयत्न हाणून पाडले गेले.