Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:23 IST2025-11-19T13:20:05+5:302025-11-19T13:23:34+5:30
Delhi Car Blast: गेल्या १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात वापरलेल्या तंत्रामुळे देशातील सुरक्षा व गुप्तचर यंत्रणांनाही धक्का बसला; कारण, ‘बूट सुसाइड बॉम्ब’चा वापर यात करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट होत आहे.

Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
हरिश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: गेल्या १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात वापरलेल्या तंत्रामुळे देशातील सुरक्षा व गुप्तचर यंत्रणांनाही धक्का बसला; कारण, ‘बूट सुसाइड बॉम्ब’चा वापर यात करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट होत आहे. ट्रायसेटोन ट्रिपरॉक्साईड (टीएटीपी) रसायन केवळ बुटाने रगडून हा स्फोट घडवण्यात आल्याचे दिसत आहे. शिवाय, या कटात व्हाइट कॉलर ‘डॉक्टर दहशतवादी नेटवर्क’ सक्रिय होते. दहशतवादाचा हा नवा मार्ग देशात चिंता वाढवणारा ठरला आहे. सुदैवाने हा धोका टळला असला तरी बुटाच्या माध्यमातून स्फोट घडवण्याचे हे तंत्र तपास संस्थांसमोर नवे आव्हान ठरणारे आहे.
दोन वर्षांपासून कारस्थान
या दहशतवादी गटाने नव्या रूपात दोन वर्षांपासून कट-कारस्थाने केली; परंतु याची कोणतीच माहिती गुप्तचरांकडे नव्हती. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर या कारवाया सुरू आहेत.
यापूर्वीही असे आत्मघाती हल्ले
२०१९ मध्ये स्फोटकांनी भरलेली व्हॅन लष्करी ताफ्यावर धडकावून केलेल्या भीषण हल्ल्यात ४० सैनिक शहीद झाले होते.
ऑक्टोबर २०२२ मध्ये तामिळनाडूत कोईम्बतूरमध्ये पोटॅशियम नायट्रेटसारख्या रसायनांनी भरलेल्या कारचा स्फोट झाला. यात इसिसचा स्वयंघोषित दहशतवादी जमिशा मोबिन मारला गेला होता.
छाप्यात या गोष्टी सापडल्या
या छाप्यात ज्या अनियमितता आढळल्या त्यात घोषित व्यावसायिक पत्त्यावर प्रत्यक्षात काहीच अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. विविध कंपन्यांशी संबंधित खात्यांत एकच मोबाइल क्रमांक व ई-मेल असल्याचे दिसून आले असून संस्थेने ईपीएफओमध्ये किंवा कर्मचारी राज्य विमा महामंडळात कोणतीही नोंदणी केलेली नाही. कंपन्यांचे संचालक किंवा प्राधिकृत लोकांच्या स्वाक्षऱ्याही संशयास्पद असून, केवायसी कागदपत्रांतही त्रुटी आढळून आल्या आहेत.
२५ ठिकाणची झडती
लाल किल्ला परिसरातील कार स्फोटाच्या तपासात ‘ईडी’ने मंगळवारी हरियाणातील फरिदाबादच्या अल फलाह विद्यापीठात तसेच या संस्थेच्या प्रशासनाशी संबंधित लोकांच्या घरांवर एकाच वेळी छापे टाकले. अल फलाह ग्रुपचे संचालक जावेद अहमद सिद्धिकी यांना मंगळवारी ईडीने अटक केली. त्यांच्यावर पीएमएलए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहाटे सव्वापाचपासून तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या सुमारे २५ परिसराची झडती घेतली. या विद्यापीठाचे एक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या परिसरात आहे. ओखला भागातील एका कार्यालयावरही छापा टाकण्यात आला. ‘ईडी’च्या या कारवाईदरम्यान ‘एनआयए’ने दोघांना ताब्यात घेतले. यूजीसीसह एनएएसीच्या मान्यतेसंबंधी दाव्यांत प्रारंभिक चौकशी विसंगत नोंदी आढळल्या आहेत. बँकिंगच्या माध्यमातून अनेक कंपन्यांत कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतन देणे, असे घोटाळे या विद्यापीठाशी संबंधित व्यवहारात आढळून आले.