दिल्ली: राजधानी दिल्लीतील एकाच घरात रविवारी 11 मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली. एकाच कुटुंबातील इतक्या व्यक्तींचे मृतदेह एकाचवेळी आढळल्यानं परिसरात मोठी घबराट पसरली. या हत्या आहेत की आत्महत्या, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. सध्या दिल्ली पोलिसांचा गुन्हे विभाग या घटनेचा तपास करत आहे. या घटनेमागे अंधश्रद्धा असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र खरंच यामागे अंधश्रद्धा आहे आहे की तसा देखावा करुन पोलिसांची दिशाभूल केली जात आहे, याचाही तपास सध्या सुरू आहे. दिल्लीतील बुरारीमधील ज्या घरात 11 जणांचे मृतदेह आढळले, त्या घरात सापडलेल्या कागदपत्रांमधील माहिती अतिशय धक्कादायक आहे. पोलिसांना तपासादरम्यान घरात दोन रजिस्टर आढळून आले आहेत. यामध्ये जो मजकूर आहे, अगदी त्याचप्रकारे घरातील एका खोलीत 10 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. तर अकरावा मृतदेह दुसऱ्या खोलीत सापडला. 'तुम्ही जर टेबलाचा वापर करुन डोळे बंद केलेत आणि हात बांधलेत, तर तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल,' असा मजकूर रजिस्टरमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे अंधश्रद्धेतून या कुटुंबानं स्वत:चा अंत केला असावा, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
डोळे बंद करुन, हात बांधून लटकल्यानं होईल मोक्षप्राप्ती; 11 मृतदेह आढळलेल्या 'त्या' घरात सापडली चिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 10:17 IST