दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 11:34 IST2025-11-21T11:33:39+5:302025-11-21T11:34:01+5:30
मुजम्मिलच्या फोनमधून दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई तसेच अनेक राज्यांमधील धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या बाजारांचे व्हिडीओ देखील जप्त करण्यात आले आहेत.

दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
१० नोव्हेंबरला देशाची राजधानी दिल्ली हादरवून सोडणाऱ्या बाँबस्फोटाच्या तपासात आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या मोबाईल फोनमधून जप्त करण्यात आलेल्या डेटाने सगळ्यांनाच मोठा धक्का दिला आहे. या डेटावरून, उच्चशिक्षित डॉक्टरांचा या स्फोटात थेट सहभाग असल्याचे आणि त्यांच्यावर जैश-ए-मोहम्मद तसेच आयएसआयएस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचा प्रभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात डॉ. मुजम्मिल याच्यासह डॉ. आदिल, शाहीन आणि इरफान यांसारख्या अनेक जणांना अटक करण्यात आली आहे.
डॉ. मुजम्मिलच्या फोनमध्ये काय काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमधून डिलीट केलेला डेटाही रिकव्हर करण्यात आला आहे. एकट्या डॉक्टर मुजम्मिलच्या मोबाईल फोनमध्ये तब्बल २०० व्हिडीओ सापडले आहेत. या व्हिडीओमध्ये जैशचा म्होरक्या मसूद अझहर, असगर आणि इतर जैश कमांडर तसेच आयएसआयएस संबंधित दहशतवाद्यांची जहाल भाषणे आणि धार्मिक भावना भडकवणारे व्हिडीओ आहेत. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, या २०० व्हिडींओंपैकी जवळपास ८० व्हिडीओ हे थेट दहशतवादी ट्रेनिंग, बाँब बनवण्याचे प्रशिक्षण आणि रासायनिक प्रक्रिया यावर आधारित संशोधनाचे आहेत.
तुर्कीमध्ये आयएसआयएस कमांडरांशी भेट
तपासणीदरम्यान, मुजम्मिलच्या फोनमधून दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई तसेच अनेक राज्यांमधील धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या बाजारांचे व्हिडीओ देखील जप्त करण्यात आले आहेत.
याशिवाय, मुजम्मिलच्या परदेशातील भेटीगाठींवरही महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. वर्ष २०२२ मध्ये डॉ. मुजम्मिल आणि या स्फोटात मारला गेलेला डॉ. उमर हे दोघेही तुर्कीमध्ये एका सीरियन आयएसआयएस कमांडरला भेटले होते. ही भेट जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरच्या इशाऱ्यावरून आयोजित करण्यात आली होती. याच भेटीदरम्यान दोघांनी बाँब बनवण्याबद्दल चर्चा केली होती आणि त्या सीरियन कमांडरने त्यांना बॉम्ब बनवण्यास मदत केली होती, असेही उघड झाले आहे.
लालबहादूर मेट्रो स्टेशनजवळ झाला होता ब्लास्ट
१० नोव्हेंबरच्या संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी दिल्लीतील लाल बहादूर मेट्रो स्टेशन पार्किंगजवळ एका i20 कारमध्ये हा स्फोट झाला होता. त्यावेळी डॉ. उमर ही कार चालवत होता आणि याच स्फोटात तोही मारला गेला. या घटनेत आतापर्यंत १३ निरपराध लोकांचा बळी गेला आहे, तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर देशभरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली असून, आतापर्यंत दोन डझनांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.