‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 07:01 IST2025-11-12T06:59:59+5:302025-11-12T07:01:03+5:30
Delhi Blast Update: लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या कार स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटक भरलेली कार चालवणारा व्यक्ती कश्मीरच्या पुलवामातील डॉक्टर उमर नबी असल्याची शंका आहे.

‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
नवी दिल्ली / श्रीनगर - लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या कार स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटक भरलेली कार चालवणारा व्यक्ती कश्मीरच्या पुलवामातील डॉक्टर उमर नबी असल्याची शंका आहे.
यामध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर केल्याचा संशय आहे. तपासात यंत्रणांनी यातील दहशतवादाच्या ‘व्हाइट कॉलर’ मॉड्यूलवर लक्ष केंद्रित केले असून, समाजासाठी उच्चशिक्षित व सुसंस्कृत मानले जाणारे हे गट एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके कसे मिळवू शकले, या दिशेने तपास सुरू आहे.जम्मू–कश्मीर पोलिसांनी स्फोटस्थळी सापडलेल्या अवशेषांशी ताडण्यासाठी उमरच्या आईचा डीएनए नमुना घेतला आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये स्फोटाला 'बॉम्ब ब्लास्ट' म्हटले गेले आहे व यूएपीए आणि एक्स्प्लोसिव्ह अॅक्टअंतर्गत दहशतवादी कटाचे कलम लावण्यात आले आहेत.
हा स्फोट घडायच्या काही तास आधीच पोलिसांनी ८ जणांना अटक केली होती, त्यात ३ डॉक्टरांचा समावेश आहे आणि अमोनियम नायट्रेट, डिटोनेटर आणि रसायने यासह २,९०० किलो स्फोटक साहित्य जप्त केले होते. फरीदाबादमधील अल फला युनिव्हर्सिटी येथे कार्यरत असलेल्या डॉ. मुज्जम्मिल गनई आणि डॉ. शहीन सईद यांना अटक केली आहे. शहीन ही जेश-ए-मोहम्मदची महिला भरती प्रमुख असल्याचा आरोप आहे. उमर नबी, हा देखील त्याच नेटवर्कशी जोडलेला होता. त्याने आय२० कारमध्येच स्फोटक भरून दिल्लीमध्ये प्रवेश केल्याचे तपासात आढळले आहे.
का केला असावा स्फोट?
स्फोट घडवून आणणारी कार डॉ. उमर चालवत होता, असे तपासात पुढे आले आहे. इतर साथीदार डॉक्टरांप्रमाणे तो पकडला जाईल, अशी त्याला भीती होती, म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे मानले जाते.
संशयितांचा देशभरात शोध
या तपासाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआयएकडे दिली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षेचा आढवा घेण्यासाठी मंगळवारी दिल्लीत बैठक घेतली.
जैश-ए-मोहम्मद आणि गजवार-ए-हिंदसारख्या संघटनांनी नव्या रूपात सुरू केलेल्या या व्हाइट कॉलर दहशतवादाचा छडा लावण्यासाठी सुरक्षा व तपास यंत्रणांनी आता देशभर संशयितांचा शोध सुरू केला आहे.
सीसीटीव्ही : स्फोटाआधी कार ३ तास पार्किंगमध्ये
कार सूनहरी मशिदीजवळील पार्किंगमध्ये ३ तास उभी होती. त्या काळात उमर आपल्या साथीदारांच्या अटकेबाबत इंटरनेटवर माहिती शोधत होता. पार्किंगमधून कार निघाल्यानंतर ४ मिनिटांनी लाल किल्ल्याजवळ एका सिग्नलवर ती आली आणि स्फाेट झाला. कारमध्ये डाॅ. उमर एकटाच होता, अशी प्राथमिक माहिती आहे. एका सीसीटीव्हीमध्ये त्याने कारचे पीयूसी केल्याचेही दिसते.
स्फोटासाठी काय वापरले?
प्राथमिक तपासानुसार, कारमध्ये अमोनियम नायट्रेट, फ्यूएल ऑइल, डिटोनेटर वापरले गेले असण्याची शक्यता आहे. नायट्रोजनयुक्त खतांसाठी, तसेच दगडांच्या खाणींत नियंत्रित स्फोटांसाठी वापरले जाणारे अमोनियम नायट्रेट एक घातक शस्त्र म्हणून दिल्लीच्या स्फोटात वापरण्यात आले.
यापूर्वी मुंबई अन् दिल्लीतही रसायनांचा वापर
मुंबई आणि दिल्लीत २००० ते २०११ या काळात झालेल्या स्फोटांमध्ये इंडियन मुजाहिद्दीन या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेने या रसायनाचा बॉम्ब तयार करण्यासाठी वापर केला होता.
...म्हणून खतांमधील वापरावर मर्यादा
अमोनियम नायट्रेटचा या प्रकारे वापर होऊ नये, म्हणून २०११ मध्ये सरकारने खतांमध्ये ४५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात या रसायनाचा वापर करण्यास बंदी घातली होती. अमोनियम नायट्रेटच्या आयातीवरही सरकारने २०१५ मध्ये सरकारने बंधने टाकली.
हा स्फोट घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेले एक दहशतवादी कृत्य असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण, एनआयए या संस्थेला केवळ दहशतवादी प्रकरणांची चौकशी करण्याचा अधिकार आहे.