स्फोटात सामील असलेल्या दोषींचा शोध घ्या, गृहमंत्री अमित शाह यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 06:11 IST2025-11-12T06:09:40+5:302025-11-12T06:11:51+5:30
Delhi Blast Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी सुरक्षा यंत्रणांना दिल्ली स्फोट प्रकरणात सामील असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, स्फोटात सामील असलेल्या सर्वांना सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागेल.

स्फोटात सामील असलेल्या दोषींचा शोध घ्या, गृहमंत्री अमित शाह यांचे आदेश
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी सुरक्षा यंत्रणांना दिल्लीस्फोट प्रकरणात सामील असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, स्फोटात सामील असलेल्या सर्वांना सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागेल. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर आयोजित दोन सुरक्षा आढावा बैठकांचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर शाह यांनी हे निर्देश दिले.
स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवला
केंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दिल्ली कार स्फोटानंतरच्या स्थितीवर आढावा बैठक घेतली. घटनेमागील प्रत्येक दोषीला पकडण्याचे निर्देश दिले. सूत्रांनी सांगितले की, पहिल्या बैठकीत केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका, दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक सदानंद वसंत दाते उपस्थित होते. जम्मू आणि काश्मीर पोलिस महासंचालक नलीन प्रभात यांचा बैठकीत ऑनलाइन सहभाग होता. गृह मंत्रालयाने स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. सरकारने स्फोटाला दहशतवादी कृत्य मानले आहे, याचे हे संकेत आहेत.
दोषींना सोडणार नाही: राजनाथ सिंह
नवी दिल्ली : देशातील आघाडीच्या तपास संस्था दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाची जलद आणि सखोल चौकशी करत आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सिंह म्हणाले, ‘तपासाचे निष्कर्ष लवकरच प्रसिद्ध केले जातील. मी राष्ट्राला खात्री देऊ इच्छितो की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा केली जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना सोडले जाणार नाही.’