अल-फलाह विद्यापीठावर लक्ष केंद्रित, चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 06:55 IST2025-11-13T06:54:23+5:302025-11-13T06:55:52+5:30
Delhi Blast Update, Al-Falah University: सुशिक्षित व्यक्ती पाकिस्तान समर्थित लोकांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे आढल्यानंतर अल-फलाह विद्यापीठ अशा व्यक्तींसाठी आश्रयस्थान कसे बनले, याचा तपास सुरू आहे.

अल-फलाह विद्यापीठावर लक्ष केंद्रित, चौकशी सुरू
फरिदाबाद - सुशिक्षित व्यक्ती पाकिस्तान समर्थित लोकांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे आढल्यानंतर अल-फलाह विद्यापीठ अशा व्यक्तींसाठी आश्रयस्थान कसे बनले, याचा तपास सुरू आहे.
विद्यापीठाच्या वेबसाइटनुसार, हरियाणा विधानसभेने हरियाणा खासगी विद्यापीठ कायद्याअंतर्गत त्याची स्थापना केली होती. १९९७ मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून त्याची सुरुवात झाली. २०१३ मध्ये, अल-फलाह अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडून (एनएएसी) ‘ए’ ग्रेड मान्यता मिळाली. २०१४ मध्ये, हरियाणा सरकारने त्याला विद्यापीठाचा दर्जा दिला. अल-फलाह मेडिकल कॉलेजदेखील विद्यापीठाशी संलग्न आहे. सुरुवातीला अल-फलाह विद्यापीठ अलिगड मुस्लीम विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामियाला पर्याय म्हणून उदयास आले.
अनेकांची केली चौकशी
पोलिसांनी सांगितले की, त्यांनी मंगळवारी दिवसभर विद्यापीठाला भेट दिली आणि अनेक लोकांची चौकशी केली. पुलवामा येथील रहिवासी डॉ. मोहम्मद उमर नबी हा अल-फलाह विद्यापीठात सहायक प्राध्यापक होता. तो स्फोटकांनी भरलेली हुंडई आय-२० चालवत असल्याचा संशय आहे. अटक केलेल्यांपैकी डॉ. मुजम्मिल गनी, अल-फलाह विद्यापीठात शिकवत होता.
‘आमची जबाबदार संस्था’
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर चौकशीच्या कक्षेत आलेल्या हरियाणातील फरिदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाने बुधवारी सांगितले की, या प्रकरणात अटक केलेल्या त्यांच्या दोन डॉक्टरांशी त्यांचे केवळ व्यावसायिक संबंध आहेत. या दुर्दैवी घडामोडीमुळे ते दुःखी आहेत. आमची जबाबदार संस्था आहे आणि देशासोबत एकजुटीने उभी आहे.