फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:09 IST2025-11-11T18:08:19+5:302025-11-11T18:09:01+5:30
मौलवी इरफानने फरीदाबादच्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना जिहादी बनवण्याचं काम केले होते. तो जैश ए मोहम्मद संघटनेशी प्रेरित होता.

फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
नवी दिल्ली - लाल किल्ल्याजवळ स्फोट होण्याच्या काही तास आधीच हरियाणा आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी फरीदाबाद मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. ज्यात अनेक डॉक्टरांचा समावेश असल्याने त्याला व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल म्हणूनही म्हटलं जात आहे. आता आणखी एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यात फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड मौलवी इरफान अहमद असल्याचं बोलले जाते. जो जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात राहणारा आहे.
मौलवी इरफान अहमद कोण आहे?
माहितीनुसार, फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये जितकेही डॉक्टर सहभागी आहेत, त्या सगळ्यांना मौलवी इरफानने कट्टरपंथी बनवले होते. मौलवी इरफान अहमदने मेडिकलच्या विद्यार्थ्यांना जिहादी बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. तो श्रीनगरच्या गर्व्हन्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये पॅरामेडिकल होता आणि सर्व विद्यार्थ्यांच्या संपर्कात सातत्याने होता. तो नौगाम मशिदीचा इमामही होता. न्यूज १८ ने हे वृत्त प्रसारित केले आहे.
कसं बनले फरीदाबाद मॉड्यूल?
मौलवी इरफानने फरीदाबादच्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना जिहादी बनवण्याचं काम केले होते. तो जैश ए मोहम्मद संघटनेशी प्रेरित होता. विद्यार्थ्यांना त्यांचे व्हिडिओ दाखवायचा. तो अफगाणिस्तानात कुणीशी तरी VOIP वरून संपर्कात होता. त्याचे काम विद्यार्थ्यांना कट्टरपंथी बनवणे हे होते आणि डॉ. मुझम्मिल शकील, डॉ. मोहम्मद उमर इरफानच्या कामाला पुढे नेण्यात सहभागी होते. शाहीन फक्त एक सूत्रधार होती, पण त्यामागे डोके इरफानचे होते असं सूत्रांच्या हवाल्याने पुढे आले आहे.
इरफान जैशसाठी काम करत होता.
मौलवी इरफान अहमदने टेलिग्राम आणि थ्रीमावर अनेक अकाउंट्स चालवले होते. या अकाउंट्सद्वारे त्याने जैश-ए-मोहम्मद साठी प्रचार केला. सूत्रानुसार, त्याने निवडक विद्यार्थ्यांना अफगाण युद्धाच्या काळातील प्रवचने देखील दाखवली. त्यांना अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील एका हँडलरकडून वैचारिक आणि मौखिक सूचना मिळाल्या होत्या असंही तपासात पुढे आले आहे.
जैशच्या एका पोस्टरमुळे मौलवी सापडला
आता फरीदाबाद मॉड्यूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मॉड्यूलचा तपास २७ ऑक्टोबर रोजी श्रीनगरमधील नौगाम येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या पोस्टरवरून सुरू झाला. या प्रकरणात सुरुवातीला तीन कामगारांना अटक करण्यात आली होती, जे एकेकाळी श्रीनगरमध्ये दगडफेकीच्या कारवायांमध्ये सहभागी होते. त्यांनी पोलिसांना मौलवी इरफान अहमद यांच्याकडे नेले. मौलवीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी डॉ. आदिल अहमद राथेर आणि जमीर अहनगर याला अटक केली, जे दोघेही इरफानचे सहकारी आहेत.
श्रीनगरमधील पुराव्यापासून दिल्ली स्फोटापर्यंत...
अटक केलेल्यांची चौकशी केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी डॉ. मुझम्मिल शकीलचा माग काढला, जो मौलवीच्या खोलीतून काम करत होता. मुझम्मिल फरीदाबादमधील धौज येथील अल फलाह विद्यापीठात काम करतो. हा मौलवी दिल्ली स्फोटांसाठी जबाबदार असणाऱ्या डॉ. मोहम्मद उमरशी देखील जोडला गेला होता, ज्याने फरीदाबाद मॉड्यूल उघडकीस आल्यानंतर घाबरून हा गुन्हा केल्याचे म्हटले जाते.