दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:33 IST2025-11-17T15:32:03+5:302025-11-17T15:33:00+5:30
तपास यंत्रणांनी दिल्ली लाल किल्ला स्फोटाशी संबंधित शाहीन परवेज आणि अन्य आरोपींविरुद्ध एक मोठा खुलासा केला आहे.

दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
दिल्लीलाल किल्लास्फोटाच्या तपासात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. तपास यंत्रणांनी या स्फोटाशी संबंधित शाहीन परवेज आणि अन्य आरोपींविरुद्ध एक मोठा खुलासा केला आहे. आरोपी आपल्या दहशतवादी कारवायांचे नियोजन करण्यासाठी आणि एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी रात्रीच्या एका विशिष्ट वेळेचा वापर करत होते, ज्याला ते 'वुल्फ आवर' म्हणत असत.
रात्री ११ ते २ या वेळेत रचला जात होता कट
तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रात्री ११ ते २वाजेदरम्यान सर्वात जास्त सक्रिय असायचे. याच वेळेत त्यांची बहुतेक संभाषणे आणि कारवाया होत होत्या. चॅट बॉक्समधील संदेशांपासून ते त्यांच्यातील संवादाचा संपूर्ण तपशील याच वेळेतील आहे. शाहीन ही 'हाउल' कोडवर्डद्वारे संभाषणाची सुरुवात करत असे, असे सांगितले जात आहे.
'वुल्फ पॅक' व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर
तपासात 'वुल्फ पॅक' नावाच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपचाही शोध लागला आहे, ज्यात अनेक लोक जोडले गेले होते. या ग्रुपची ॲडमिन शाहीन असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य आरोपी परवेज आणि आरिफ देखील या ग्रुपचे सदस्य होते. आरिफच्या क्रमांकासमोर 'स्पायरो' नाव लिहिलेले आढळले आहे. ग्रुपमध्ये ग्रिफ़िथ आणि कुरनेलियुस सारख्या सांकेतिक नावांचा वापर केला जात होता.
महिला दहशतवाद्यांची 'ऑरोरा' आणि 'लूना' टीम
तपास यंत्रणांनी सांगितले की, शाहीन महिला दहशतवाद्यांच्या दोन वेगवेगळ्या टीम तयार करत होती. तिने या टीमना मादी लांडग्यांच्या नावावरून 'ऑरोरा' आणि 'लूना' अशी नावे दिली होती. ग्रुपमध्ये 'मॅडम सर्जन' किंवा 'अल्फा' म्हणून ओळखली जाणारी शाहीन, 'वुल्फ आवर'मध्येच सर्व महत्त्वाचे संदेश कोडवर्डमध्ये देत असे.
'लोन वुल्फ' हल्ल्याची योजना
शाहीन आरोपींना लांडग्यांच्या पद्धतीनुसार दबा धरून हल्ले करण्याची योजना आखण्याचा सल्ला देत होती, असेही सांगण्यात येत आहे. परवेजने ग्रुपमध्ये 'लोन वुल्फ अटॅक'बद्दलही माहिती विचारली होती. याव्यतिरिक्त, परवेजच्या घरातून छापेमारीदरम्यान चापड देखील जप्त करण्यात आली आहे.