i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:25 IST2025-11-13T13:25:15+5:302025-11-13T13:25:47+5:30
आता तपास यंत्रणांना आणखी एक ब्रेजा कार सापडली आहे. ही ब्रेजा कार अल फलाह यूनिवर्सिटीच्या आतमध्ये पार्क केली होती.

i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीत १० नोव्हेंबरच्या संध्याकाळी सातच्या सुमारास जोरदार स्फोट झाला. या भीषण स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा करत आहेत. त्यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. दहशतवाद्यांनी दिल्लीला हादरवण्याचं पूर्ण प्लॅनिंग आखले होते. हे षडयंत्र अंमलात आणण्यासाठी एक नाही, दोन नाही तर ३ कारचा वापर करण्यात येणार होता. ज्यात तिसऱ्या कारचा शोध आता लागला आहे.
ज्या आय २० कारचा वापर दिल्लीतील स्फोटासाठी डॉ. उमर मोहम्मदने केला होता, त्याची खरेदी विक्री बऱ्याचवेळा झाली होती. त्याचा खरा मालक पुलवामा येथे राहणारा आमिर राशिद होता. त्याशिवाय फरीदाबाद येथील सुरक्षा यंत्रणांना बेवारस अवस्थेत एक लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार सापडली आहे. ही कार डॉ. उमदरचा नातेवाईक फहीम तिथे पार्क करून फरार झाला होता. आता फहीमला ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत. सुरुवातीच्या तपासात फहीम स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. उमर यांच्या नातेवाईकांमधील आहे. फहीमने कार खंडवाली परिसरात का पार्क केली, त्याला ती कार कुणाला द्यायची होती आणि हल्ल्याबाबत त्याला काय माहिती होते याचा तपास सुरू आहे.
अल फलाह यूनिवर्सिटीत मिळाली ब्रेजा कार
आता तपास यंत्रणांना आणखी एक ब्रेजा कार सापडली आहे. ही ब्रेजा कार अल फलाह यूनिवर्सिटीच्या आतमध्ये पार्क केली होती. ही ब्रेजा कार दिल्ली स्फोटातील आरोपी डॉ. उमर आणि डॉ. मुझम्मिल वापर करत होते. दिल्ली स्फोटातील डॉ. उमरचा डीएनए त्याच्या आईशी जुळला आहे. त्यामुळे डॉ. उमरने आय २० कारसह स्वत:ला उडवून आत्मघाती हल्ला घडवल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, स्फोटाच्या दिवशी डॉक्टर उमर हा लाल किल्ल्याजवळ तुर्कमान गेट भागात असलेल्या फैज-ए-इलाही मशिदीत गेला होता. रामलीला मैदानासमोर तुर्कमान गेटच्या अगदी जवळ असलेल्या या मशिदीत त्याने सुमारे दहा मिनिटे घालवली. त्यानंतर तो बाहेर आला आणि रस्त्यावर फिरताना दिसला. स्फोट घडवण्याच्या काही तास आधी जैश-ए-मोहम्मद संबंधित फरीदाबाद टेरर मॉड्यूलमधील त्याचे साथीदार अटक झाले होते. यामुळे घाबरून आणि पोलिसांचा दबाव वाढल्याने, उमरने ठरलेल्या वेळेपूर्वीच घाईघाईत शहराच्या सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणला. या स्फोटात १२ लोकांचा बळी गेला.