२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 10:11 IST2025-11-24T10:10:45+5:302025-11-24T10:11:09+5:30
दहशतवादी मॉड्युलच्या सदस्यांनी दहशतवादी हल्ले करण्यासाठी आईडी कशी बनवायची, हे शिकण्यासाठीही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला.

२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
नवी दिल्ली : लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पुढे आलेल्या व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युलमध्ये सामील झालेल्या डॉक्टरांचे कट्टरपंथीकरण २०१९ मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सुरू झाले, अशी माहिती समोर आली आहे. तपासात सहभागी अधिकाऱ्यांनी सांगितले, उच्च शिक्षित व्यावसायिकांना पाकिस्तान व जगाच्या इतर भागांमध्ये असलेल्या दहशतवादी सूत्रधारांकडून दहशतवादी कारवायांसाठी तयार केले जात आहे. तेही पूर्णपणे डिजिटल माध्यमातून तयार केले जात आहे.
सूत्रांनी सांगितले की, दहशतवादी मॉड्यूलचे सदस्य, ज्यात डॉ. मुझम्मिल गनई, डॉ. आदिल राथेर, डॉ. मुझफ्फर राथेर आणि डॉ. उमर-उन-नबी यांचा समावेश आहे. सुरुवातीला सीमेपलीकडून त्यांच्या हँडलर्सना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असल्याचे आढळले. या व्यक्तींना ताबडतोब टेलिग्रामवरील ग्रुपमध्ये जोडले गेले. जिथे त्यांचे कट्टरपंथीकरण करण्यात आले. त्यानंतर दहशतवादी मॉड्युलच्या सदस्यांनी दहशतवादी हल्ले करण्यासाठी आईडी कशी बनवायची, हे शिकण्यासाठीही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला.
भारतात कोणताही मुस्लीम कुलगुरू होऊ शकत नाही
जमियत उलेमा-ए-हिंद (एएम) प्रमुख अर्शद मदानी यांनी दिल्ली बॉम्बस्फोटांशी जोडलेल्या अल-फलाह विद्यापीठाचा उल्लेख करून मुस्लिमांविरुद्ध भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. मदानी यांनी दावा केला की जोहरान ममदानी न्यू यॉर्कचे महापौर म्हणून निवडले जाऊ शकतात, तर खान लंडनचे महापौर म्हणून निवडले जाऊ शकतात, परंतु भारतात कोणताही मुस्लीम विद्यापीठाचा कुलगुरू होऊ शकत नाही. मदनी म्हणाले, "आणि जर कोणी असे केले तर त्यांना आझम खान सारखे तुरुंगात पाठवले जाईल. भाजप नेत्यांनी यावर मदनीवर टीका केली. तसेच दिल्ली बॉम्बस्फोटांच्या तपासाला जातीय रंग देत असल्याचाही आरोप केला.
अटकेतील मौलवीला डॉक्टरकडून हवे सहा महिन्यांचे थकीत भाडे
हरियाणाच्या मेवात येथील मौलवी इश्तियाक याचे अल फलाह विद्यापीठाजवळ घर आहे. त्याने दिलेल्या भाड्याच्या खोलीतून अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम क्लोरेट व सल्फरसह २,५०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान मौलवी इश्तयाकने सांगितले की, गनई व उमरने या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्याशी संपर्क साधला. त्याच्या घरी खतांसारख्या काही वस्तू ठेवण्यासाठी विचारणा केली होती. त्याच्या बदल्यात २,५०० रुपये महिना भाडे देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, तेथे नेमके काय ठेवले जाणार आहे, याची इश्तियाकला कल्पना नव्हती. सहा महिन्यांपासून त्याचे भाडे थकीत आहे, तेवढे मिळवून द्या. चौकशीदरम्यान गनईने इश्तियाकच्या म्हणण्याला दुजोरा दिला.