दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:18 IST2025-11-11T12:17:51+5:302025-11-11T12:18:46+5:30
उमरने स्फोटकांसोबत डिटोनेटर कारमध्ये ठेवल्याचे वृत्त आहे. फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणात जप्त केलेले अमोनियम नायट्रेट या मोठ्या स्फोटासाठी इंधन तेलासह वापरले गेले होते असं तपासात समोर आले आहे.

दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
नवी दिल्ली - दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामागील एक नाही तर चार डॉक्टरांची क्रूरता उघडकीस येत आहे. यापैकी तीन डॉक्टरांना पोलिसांनी आधीच अटक केली होती आणि चौथा डॉक्टर जो फरार असल्याचं म्हटलं जात होते, त्याने अटक होण्यापूर्वीच दिल्लीत आत्मघाती हल्ला केल्याचा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आणि आत्मघाती हल्ल्यातील संशयित मानला जाणारा डॉ. उमर मोहम्मद असल्याचं सांगितले जाते. जो अटकेच्या भीतीने फरार असल्याचे सांगितले जात होते. डॉ. उमर फरिदाबादमधील अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत होता.
डॉक्टर उमर मोहम्मदने हा स्फोट घडवून आणला
सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळील चांदणी चौकात झालेल्या कार बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टर मोहम्मद उमर हा फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलमधील फरार आरोपी असल्याचे सांगितले जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो स्फोटात वापरलेली I20 कार चालवत होता. अटकेच्या भीतीने त्याने घाईघाईने दोन साथीदारांसह स्फोट घडवण्याचं प्लॅनिंग केले आणि संध्याकाळपर्यंत तो घडवून आणला असा संशय आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून फरार संशयिताची ओळख पटली
उमरने स्फोटकांसोबत डिटोनेटर कारमध्ये ठेवल्याचे वृत्त आहे. फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणात जप्त केलेले अमोनियम नायट्रेट या मोठ्या स्फोटासाठी इंधन तेलासह वापरले गेले होते असं तपासात समोर आले आहे. स्फोटाचे ठिकाण आणि वेळ (लाल किल्ल्याजवळ) जास्तीत जास्त जीवितहानी व्हावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नॅरेटिव्ह तयार करावं यासाठी निवडण्यात आली होती. सोमवारी संध्याकाळी ६:५२ वाजण्याच्या आधी स्फोटाच्या वेळी डॉ. उमर उपस्थित होता याची पुष्टी सीसीटीव्ही फुटेजवरून होते.
३ तास पार्किंगमध्ये उभी होती कार
हल्ल्यात वापरलेली कार घटनेच्या तीन तास आधी जवळच्या मशिदीजवळ उभी होती. ती त्या पार्किंगमध्ये दुपारी ३:१९ वाजता आली होती आणि स्फोटाच्या फक्त चार मिनिटे आधी सकाळी ६:४८ वाजता ती काढून टाकण्यात आली. सुरुवातीला ड्रायव्हर डॉ. उमरचा चेहरा स्पष्ट दिसत होता, परंतु पुढे गेल्यावर त्याने मास्क घातला होता. स्फोटाच्या वेळी संशयित कारमध्ये एकटाच होता असं दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. कारमध्ये आणखी दोन लोक होते. हरियाणा नोंदणी क्रमांक असलेली कार बदरपूर सीमेवरून दिल्लीत प्रवेश केली असं याआधी पोलिसांनी म्हटलं होते.
डॉ. मुझम्मिल शकीलच्या अटकेनंतर दहशतीत
सूत्रांनुसार, डॉ. मुझम्मिल शकीलच्या अटकेची बातमी कळताच डॉ. उमर घाबरला असावा, म्हणूनच त्याने आत्मघातकी हल्ला जलद केला. हरियाणा आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत याच डॉक्टरकडून २,९०० किलो आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. शकील हा फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठात प्राध्यापक आहे.
डॉ. आदिल राथेर आणि डॉ. शाहीन यालाही अटक
पोलिसांनी आतापर्यंत फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलमधील एकूण आठ जणांना अटक केली आहे, त्यापैकी सात जण काश्मीरमधील आहेत. डॉ. मुझम्मिल शकील उर्फ मुसैब हा पुलवामा येथील कोइल येथील रहिवासी आहे. या प्रकरणात अटक केलेला दुसरा डॉक्टर आदिल राथेर हा कुलगाम येथील वालपोरा येथील रहिवासी आहे आणि तो अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात तैनात होता. तो मोहम्मद उमरचा खूप जवळचा असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी लखनौ येथील रहिवासी असलेल्या शाहीन शाहिद या महिला डॉक्टरलाही अटक केली आहे. ती अल फलाह विद्यापीठात डॉ. शकीलची सहकारी देखील आहे. अटक करण्यात आलेल्या या डॉक्टरांपैकी पहिला डॉक्टर अनंतनाग येथील रहिवासी २७ वर्षीय डॉ. अलिद राथेर होता, ज्याला एका आठवड्यापूर्वी श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदशी संबंधित पोस्टर्स लावल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्याच्या वैयक्तिक लॉकरमधून एके-४७ जप्त करण्यात आली होती.